कऱ्हाड : शहरात अनेक खासगी, सहकारी व शासकीय बँकांच्या शाखा आहेत. तसेच या बँकांची एटीएम केंद्रेही आहेत. मात्र, सध्या एटीएम केंद्रांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी मलकापुरात महामार्गाच्या कडेला असलेले एक एटीएम फोडले. त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला; पण वारंवार घडणाऱ्या या घटनांमधून एटीएमच्या सुरक्षेबाबत आर्थिक संस्थांचा असलेला निष्काळजीपणा चव्हाट्यावर येत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांसह खासगी, सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या बँका, पतसंस्था तसेच अनेक फायनान्स कंपन्यांच्या शाखा कऱ्हाडला आहेत. या शाखांमध्ये दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होतात. मात्र, आर्थिक उलाढाल मोठी असलेल्या अनेक शाखांची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ आहे. संबंधित आर्थिक संस्थांमध्ये दिवसभर कर्मचारी काम करतात. त्यामुळे चोरी होण्याची शक्यता नसते. मात्र, सायंकाळी कर्मचारी घरी निघून गेल्यानंतर चोरी रोखण्यासाठी कोणतीच खबरदारीची उपाययोजना केलेली नसते. बहुतांश संस्थांमध्ये ही परिस्थिती आहे. आर्थिक संस्था रात्रभर फक्त कुलपाच्याच भरवशावर असतात. बँका, पतसंस्था तसेच फायनान्स कार्यालयांसह एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी विविध बँकांनी ठिकठिकाणी एटीएम सेंटर सुरू केली आहेत़ एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही बँकांकडून सुरू आहे़ एखाद्या मशीनला तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास काही वेळातच बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची दुरुस्ती केली जाते़ दररोज एटीएम मशीनमध्ये पैशाचा भरणा केला जातो़ भरणा करताना व मशीनची दुरुस्ती करताना काहीवेळ एटीएम सेंटरचा दरवाजा बंद करण्यात येतो़ सुरक्षेच्या दृष्टीने केली जाणारी ही तात्पुरती उपाययोजना आहे़ मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बँका निरुत्साही आहेत़ एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न यापूर्वी कऱ्हाडमध्ये अनेक वेळा झाला आहे़ अशी घटना घडल्यानंतर बँकांकडून उपाययोजनांचे आडाखे बांधले जातात़ मात्र, घटना घडून काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती होते़
- चौकट
रखवालदार नाही; देखरेख करायची कुणी?
सध्या शहरातील बहुतांश एटीएम सेंटरना रखवालदार नाहीत़; त्यामुळे कधीही आणि कुणीही एटीएममध्ये प्रवेश करू शकतो, अशी परिस्थिती आहे़ हटकणारे कुणीही नसल्यामुळे काही वेळा एटीएमच्या परिसरात काहीजण तासन्तास विश्रांती घेतात़ किमान रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी रखवालदार नेमणे गरजेचे असताना बँका त्याकडे म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने पाहत नाहीत.
- चौकट
सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरही धूळ
एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही असतात. मात्र, कऱ्हाडमध्ये काही सेंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी मोडतोड होऊन कॅमेरे लोंबकळत असल्याचे दिसते; तर काही ठिकाणी कॅमेऱ्यांवर धूळ साचल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीत सीसीटीव्हीद्वारे चित्रण कसे होणार, हासुद्धा प्रश्न आहे.
- चौकट
‘एटीएम’साठी आवश्यक सुरक्षा
१) चोवीस तास पहारेकरी असावा.
२) सीसीटीव्ही यंत्रणा असावी़
३) सीसीटीव्हीमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करावी़
४) काचांना गडद फिल्मिंग नसावे़
५) सेंटरची समोरची बाजू पारदर्शी असावी.
६) बँकेच्या जाहिराती काचांवर असू नयेत़
७) आत व बाहेर लाईटची सोय असावी़
८) दरवाजाला ‘कार्ड स्वाईप’ची प्रणाली असावी़
- कोट
एटीएमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस यंत्रणेकडून बँकांशी पत्रव्यवहार करण्यात येतो. याबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठकही यापूर्वी घेण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक बँका एटीएमच्या सुरक्षेबाबत म्हणाव्या तेवढ्या गंभीर नाहीत. बँकांनी एटीएमच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- बी. आर. पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कऱ्हाड
फोटो : ०२केआरडी०७
कॅप्शन : कऱ्हाडातील अनेक बँकांची एटीएम केंद्रे अशाच पद्धतीने दिवसा आणि रात्रभर सताड उघडी असतात.