विनोद पोळ --कवठे --कोणतीही कला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. शिल्पकार दगडातून मूर्ती घडवतो, तिची मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते. तेव्हा तो धन्य पावतो. सुतारकाम हेही एक कलाच आहे. शेती अवजारे बनविण्याचे काम तो करत असला तरी कवठे येथील बाळकृष्ण सुतार यांच्या कलेची घरोघरी पूजा होणार आहे. कवठेचे बगाड राज्यभर प्रसिद्ध आहे. या बगाडाची प्रतिकृती बाळकृष्ण सुतार यांनी तयार केली आहे. चित्रकलेची ओढ असल्याने बाळकृष्ण सुतार यांनी १९७९ मध्ये अभिनव कला महाविद्यालायातून पाच वर्षांचा कमर्शियल आर्ट डिप्लोमा पूर्ण केला. मराठी विश्वकोष वाई येथे सहायक मानदचित्रकार म्हणून १९८९ पर्यंत नोकरी केली. घराशेजारीच असलेल्या भैरवनाथ मंदिरात उत्कृष्ठ तबला वादन करीत गेले दोन पिढ्या चालत आलेला भजन, कीर्तनात गात देहभान विसरायचे हाच यांचा दिनक्रम. अचानक एक वादळी घटना घडली आणि त्यांच्या दिनक्रमात बदलच झाला. बाळकृष्ण सुतार यांच्यासह २२ कर्मचाऱ्यांना मराठा विश्वकोष कार्यालय वाई यांनी अचानक नोकरीतून कपात केले. तेथूनच या सर्वांनी मिळून या कार्यालयाच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. निकाल लागल्यावर सेवेत घेतील किंवा सेवा भरपाई मिळेल, या आशेवर निवृतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. उत्पनाचे स्रोत संपले, शेतजमिनीच्या मालकीचा वितभर तुकडा त्यात कुटुंबाचा चरितार्थ चालेना, आयुष्य स्वत:च्या हिकमतीवर जगल्याने मोलमजुरी करावीशी वाटेना. तीन मुलांसह सुखात चाललेल्या संसाराला नोकरी सुटल्याने ग्रहण लागले. यातून बाहेर पडण्यासाठी पिढीजात सुतारकीचा व्यवसाय सुरू केला. पण रेडिमेडच्या दुनियेत व्यवसायाचा जम बसेना. यावर मात करीत काही तरी वेगळी वाट चोखाळली पाहिजे, या विचाराने त्यांची झोप उडाली व एकेदिवशी सातारा येथील हॉटेल व्यावसायिक व कवठे गावाचे जावई कणसे यांनी गौरी-गणपतीसाठी कवठेतील बगाडाची प्रतिकृती बनवून मागितली. अन् नव्या आयुष्याला सुरुवात झाली.गौरी-गणपती स्पर्धेत बक्षीससुतार यांनी बनवलेल्या बगाडला गौरी-गणपती सजावट स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यातूनच त्यांना सुचली पारंपरिक व्यवसायाची सांगड घालीत व्यवसायाची नवीन वाट मिळाली. कवठे, बावधन, सुरूर, ओझर्डे, पांडे, मर्ढे, पसरणी या गावांतून ग्रामदैवत भैरवनाथाची बगाडयात्रा साजरी केली जाते. त्या ठिकाणी प्रतिकृतीला चांगली मागणी असते.‘काशिनाथाचं चांगभलंऽऽऽ’ म्हटलं की, या गावातील लोकांना वेगळेच स्फुरण चढते. बगाड हे पूर्णत: लाकूड व दोरीत बनते. भैरवनाथाच्या बगाडाच्या याच श्रद्धेचा व्यवसायासाठी उपयोग सुतार यांनी केला व बगाड प्रतिकृती तयार करून विकण्याचा व्यवसाय यांनी सुरू केला. आजमितीस बाळासाहेब व त्यांचे चिरंजीव सुधीर सुतार दर महिन्याकाठी पंधरा प्रतिकृती तयार करतात. बाळासाहेब हे पुन्हा भैरवनाथाच्या चरणी बगाड प्रतिकृती बनवीत भजन, कीर्तनात तल्लीन आहेत. बगाडाच्या प्रतिकृतीस प्रचंड मागणी असून सातारा, कऱ्हाड येथील मोठ-मोेठे व्यावसायिक कार्यालयात तसेच शहरातील लोक बंगल्यात शो-पीस म्हणून बगाड ठेवतात. बगाड असलेल्या सर्वच गावांतील लोक घरात देव्हाऱ्याजवळ ही प्रतिकृती ठेवतात. माझ्याकडे तीन-चार महिन्यांचे आगाऊ बुकिंग लोक करतात. - बाळकृष्ण सुतार,कलाकार
‘घरोघरी बगाड’साठी बाळकृष्णांचे हात कामाला !
By admin | Updated: March 24, 2016 23:58 IST