लोणंद : ‘ॲड. बाळासाहेब बागवान यांच्या जाण्याने राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वधर्म समभावाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहत होतो, असे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,’ अशा भावना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केल्या.
सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. बाळासाहेब बागवान यांचे शुक्रवार (दि. २६) रात्री आठ वाजता लोणंद येथे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, सर्वच पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोणंदचा आनंद नाहीसा झाल्याची भावना व्यक्त केली. आमदार मकरंद पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता व दीनदलितांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली.
खंडाळा तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणाऱ्या या नेत्याने लोणंदचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे ते म्हणाले. अंत्ययात्रा लोणंद शहरातून जाताना शेकडो नागरिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. संपूर्ण बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती.