प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या सर्व उमेदवारांनी ८ हजारावर मतांची मोठी आघाडी घेतली. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कारखान्यावर कायम राहिली आहे. यात विरोधात पॅनेल टाकलेल्या आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनेलचा पराभव झालाच पण भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व सहकाऱ्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असेच चित्र समोर आले आहे.
गत ३ पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करण्यात यश आलेल्या माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना यंदा मात्र तिरंगी लढतीला सामोरे जावे लागले. त्यांच्याविरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे व अँड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांचे एक पॅनेल तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात या तिघांचे एक पॅनेल अशी तिरंगी लढत झाली.
सह्याद्रीच्या निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मतदारांच्या गाठीभेटी, जाहीर प्रचार सभा, त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या.त्यानंतर जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार ?याची उत्सुकता चांगलीच ताणली होती. अखेर रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी चित्र स्पष्ट झाले आहे. शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी कार्यक्षेत्रातील ९९ मतदान केंद्रावर अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. एकूण मतदारांपैकी ८१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या कराड येथील मतमोजणी केंद्रात जमा करण्यात आल्या. तर रविवार दिनांक ६ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाली.
पहिल्यांदा १ ते ५० मतदान केंद्रावरील मतमोजणी झाली. त्याचा निकाल दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला. त्यात सुमारे ४ मतांची आघाडी सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पनेलने घेतल्याचे समोर आले. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उरलेल्या ५१ ते ९९ या मतदान केंद्रावरील मतमोजणीला सुरुवात झाली. त्यातही तोच ट्रेंड कायम दिसतात कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष करायला सुरुवात केली.
रात्री १० घ्या सुमारास उत्पादक गटातील मतमोजणी संपली त्यात ८ हजारावर मतांची आघाडी सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने विजयी मिळविला.इतर गटातील मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
पी डी पाटील पॅनेलचा उमेदवारांनी सुमारे ८००० मताधिक्याने विजय मिळवला
माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनेलने सुमारे ८००० मताधिक्याने निवडणूक जिंकली आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी ७५०० मते मिळाली तर बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला सरासरी १५ हजार ५०० मते मिळाली आहेत. काँग्रेसचे निवास थोरात,भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला सरासरी २२०० वी मते मिळाली आहेत.
पी डी पाटील पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
कऱ्हाड गट १ शामराव पांडुरंग पाटील १५०२७ अण्णासो रामराव पाटील १५५०१ तळबीड गट क्रमांक २ संभाजी शंकर साळवे १४४९३ सुरेश नानासो माने १५१९१ उंब्रज गट क्रमांक ३ विजय दादासो निकम १४७७० संजय बापूसो गोरे १५२६६ जयंत धनाजी जाधव १४७८८ कोपर्डे हवेली गट क्रमांक ४ सुनील जानदेव जगदाळे १४८६७ नेताजी रामचंद्र चव्हाण १५५३७ राजेंद्र भगवान पाटील १४८२८