सातारा : विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील बाळासाहेब पाटील आणि सत्यजीतसिंह पाटणकर यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले होते. ही तपासणी दि. १० रोजी होणार होती. तथापि, दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असल्यामुळे ही प्रक्रिया रद्द झाली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शशिकांत शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचसंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावण्या सुरू आहेत.सातारा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये होऊन महायुतीचे आठही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले होते. या निकालावरून ईव्हीएमवर शंका घेऊन महाविकास आघाडीचे कऱ्हाड उत्तरमधील उमेदवार बाळासाहेब पाटील आणि पाटण मतदारसंघातील उमेदवार सत्यजीतसिंह पाटणकर यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. बाळासाहेब पाटील यांनी दहा मतदान केंद्रांची निवड करून त्यासाठीचे ४ लाख ७२ हजार शुल्क भरले होते. तर पाटणकर यांनी तीन केंद्रांसाठी १ लाख ४१ हजार ६०० रुपये शुल्क भरले होते. प्राप्त झालेल्या अर्जानुसार सोमवार, दि. १० रोजी ही प्रक्रिया सुरू होणार होती तर अर्ज घेण्यासाठी दि. ७ पर्यंत मुदत होती. तथापि, दि. ४ रोजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी तर दि. ५ रोजी सत्यजीतसिंह पाटणकर यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे त्यांचे शुल्क परत देण्यात येणार आहेत. द्वितीय क्रमांकाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने कऱ्हाड उत्तर आणि पाटण मतदारसंघातील ईव्हीएमबाबतच्या तक्रारी निकाली निघाल्या आहेत.
चव्हाण, शिंदे यांच्या न्यायालयात याचिकामाजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार व कोरेगावचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. ईव्हीएम पडताळणीबरोबच व्हीव्हीपॅटचीही पडताळणी करण्याची मागणी करत शशिकांत शिंदे यांनी न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकांवर सुनावण्या सुरू आहेत. याशिवाय कऱ्हाड दक्षिणचे उमेदवार गजानन आवळकर यांनीही याचिका दाखल केली आहे.
अशी असते प्रारुप फेरमतमोजणी प्रक्रिया
- फेरमतमोजणी प्रक्रियेबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. वास्तविक या प्रक्रियेत केवळ ईव्हीएम मशीनची पडताळणी करता येते.
- ज्या मशीनची पडताळणी करायची आहे त्यातील जुना डाटा डिलिट केला जातो. त्यानंतर त्या मशीनवर उमेदवाराला जास्तीत जास्त १४०० इतके मतदान करता येते. ही मते त्यास तपासून यंत्राबाबतची शंका तपासून घेता येते.
- पूर्वी निवडणुकीला झालेले मतदान या प्रक्रियेत तपासता येत नाही तसेच निवडणुकीवेळच्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याही पाहता येत नाहीत.