मलटण : पुणे-पंढरपूर रोड ते फलटण सातारा रोड यांना जोडणारा उळुंबमार्गे पालखी महामार्गाला जोडणारा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा समजला जातो. फलटणला बाह्यवळण रस्ता म्हणूनही याकडे पाहिले जाते. या रस्त्यावर असणारी वाहतूक पाहता रस्ता खूपच खराब झाला आहे. काही वर्षांपूर्वी हा रस्ता अतिशय उत्तम स्थितीत होता. गेल्या काही महिन्यांपासून या रत्यावर वाहतूक वाढत आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला असणे गरजेचे आहे.
सध्या रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. रस्त्याची खडी उखडली असून, वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती, तसेच काही छोट्या औद्योगिक कंपन्या सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याची दुरवस्था पाहता नागरिक या मार्गे प्रवास करणे टाळत आहेत. परिणामी वेळ व आर्थिक झळ सोसावी लागत असल्याने हा संपूर्ण रस्ता नव्याने अथवा दुरुस्त करण्यात यावा, अशी स्थानिक तसेच प्रवासी नागरिकांची मागणी आहे.