सातारा : एकवेळ आपल्या ‘हायवे’वरचे खड्डे दुरुस्त होतील. सातारची पोरं ‘ट्रिपल सीट’ फिरायचं बंद करतील. उरमोडीचं पाणी बारा महिने-चोवीस तास माण-खटावच्याच शिवारात खेळेल... पण ‘कऱ्हाड-दक्षिण’चा आमदार कोण?’ हे सांगता येणार नाही. खरंच; अशी टस्स्ल आजपर्यंत कोणत्याच मतदारसंघात झाली नसावी. शेजारच्या ‘पाटण’ अन् ‘कऱ्हाड उत्तर’ मध्येही जबरदस्त चुरस असली तरी निकाल थोडाफार अपेक्षित. मात्र, आकडे ‘अनपेक्षित’ असतील.पाटणच्या सरदारांनी आपला ‘राजमुकूट’ राजपुत्राच्या माथ्यावर बसविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. स्वत:च्या निवडणुकीत कधी ताकद लावली नसेल, एवढी प्रतिष्ठा विक्रमसिंहदादांनी पणाला लावली. पाटणची तरुणाई ‘खूप छान मॅनेज’ केली. स्वत:च्या राजकीय निवृत्तीला ‘इमोशनल टच्’ दिला तर ‘महिला सभापती’ प्रकरणात विरोधकांचा ‘खलनायक सीन’ उभा केला. ‘घराण्याची पुण्याई’ अन् ‘वडिलधाऱ्यांचं कर्तृत्व’ बच्चूदादांच्या पाठीशी दमदारपणे उभं होतं; पण भाग्य कदाचित ‘शंभूराज’ सोबत होतं.महायुती फुटली. आघाडी तुटली, तालुक्यात अस्तित्व नसलेल्या भाजपचा उमेदवार स्वतंत्रपणे उभारला; परंतु त्याचा ‘शंभूराज’च्या मतांवर फरक पडणार नव्हता. काँग्रेसकडून उभारलेल्या हिंदुरावांमुळं मात्र, पाटणकर गटाची समीकरणं बदलली. अशातच कुंभारगाव परिसरात काकांच्या कार्यकर्त्यांनी आतून ‘बाण’ सोडला. त्यामुळं ‘निकाल काय असू शकतो,’ याचा अंदाज अनेकजण वर्तवू लागले. असं असलं तरीही, दादांचा ‘हुकूमी पट्टा’ असलेल्या पाटण शहरात भरभरून मतदान झालंय. त्यामुळं इथली ‘प्रचंड टक्केवारी’ पाहता पाटणचं भवितव्य ठामपणे सांगणं, कुणालाही कठीणच.‘कऱ्हाड दक्षिण’ मधल्या उमेदवारांचा फायदा जसा ‘पाटण’वाल्यांनी घेतला. तसाच ‘कऱ्हाड उत्तर’ मध्येही या ‘राजनीतीचा’ पुरेपूर वापर झाला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा दीडशे कोटींचा निधी वापरून धैर्यशील मैदानात उतरले... पण संपूर्ण राज्यात झंझावाती दौरा करणाऱ्या पृथ्वीराजबाबांची एकही प्रचारसभा या भागात होऊ नये, ही जेवढी आश्चर्याची बाब, तेवढीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे बावीस नगरसेवक काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसावेत, ही सुद्धा योगायोगाचीच गोष्ट. ‘मंगळसूत्र राष्ट्रवादी’चं; पण ‘संसार काँग्रेस’शी थाटणाऱ्या इथल्या नेत्याची भूमिका इथंही दोन्ही डगरीवर हात ठेवूनच चालली. यामुळं इथला निकाल कदाचित ‘धक्कादायक’ नसेल; पण ‘पुसेसावळीचा बळी’ देऊन मिळविलेले आकडे नक्कीच ‘अनपेक्षित’ असतील. असं असलं तरीही, खोतांच्या भाषणामुळं जोरदार ‘शिट्टी’ वाजण्याची आशा ‘स्वाभिमानी’ शेतकऱ्यांना आहेच. असो, निवडणुकीच्या रणांगणात नेमकं काय- काय घडलं. हे आपण गेल्या तीन दिवसात बघितलं... पण अधिकृत शिक्कामोर्तब तर आज रविवारीच होणार! (समाप्त)
बाबा की काका... प्रसंग बाका !
By admin | Updated: October 18, 2014 23:25 IST