वडूज : वीज वितरण कंपनीचे कृषीपंप २०२० धोरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याबरोबर कृषीपंपाच्या थकीत वसुलीसाठी पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी खटाव पंचायत समितीच्या मासिक सभेत आवाहन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती जयश्री कदम होत्या. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे, कल्पना मोरे, रेखा घार्गे, मेघा पुकळे, वनिता हिरवे, गटविकास अधिकारी रमेश काळे उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना माजी सभापती मांडवे यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढाव्यात उपअभियंता संभाजी देसाई यांनी वडूज-नागाचे कुमठे, वडूज-पेडगाव, बनपुरी ते प्रजिमा, पुसेसावळी, औंध, येळीव, कातरखटाव-कलेढोण-जिल्हा हद्द, वडगाव-गोरेगाव, वडगाव-वांझोळी, म्हासुर्णे-खेराडे आदी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली. यावेळी कलेढोण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा मेघा पुकळे यांनी उपस्थित केला.
आरोग्य विभागाच्या आढाव्यात अपघातग्रस्तांना महात्मा फुले आरोग्य हमी योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच अडचणीच्यावेळी काही खासगी न्युरोसर्जन फोन उचलत नसल्याची तक्रार मांडवे यांनी केली. याबाबत ठराव घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. घरकुलासंदर्भात पंडित दिनदयाल योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचाही मुद्दा मांडवे यांनी उपस्थित केला. शिक्षण विभागाच्या चर्चेत जॉयफुल शिक्षण, गेल्यावर्षीचा एक लाख ७० हजारांचा अखर्चित शेस निधी,१२ कोरोनाबाधित शिक्षकांचा परिणाम आदींबाबत साधक-बाधक चर्चा झाली.
यावेळी अखर्चित निधी कशामुळे राहिला, याचे कारण नोंद करावे, अशी टिप्पणी गटविकास अधिकाऱ्यांनी केली.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आढाव्यात मागील वर्षातील २५ पैकी २२ कामे पूर्ण झाली आहेत; तर सद्या वडगाव, वर्धनगड, उंचीठाणे, पुसेसावळी येथील हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती प्रगतीपथावर असल्याची माहिती उपअभियंता मोहन घाडगे यांनी दिली. यावेळी निमसोड येथील दोन व पुसेगाव येथील एक काम अपूर्ण राहिल्याचा मुद्दा उपस्थित झाला.
त्यावर माजी सभापती कल्पना मोरे म्हणाल्या, ‘सदस्यांची मुदत संपत आली, तरी कामे होत नसतील, तर हे अतिशय खेदजनक आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यात उपअभियंता एस. के. झेंडे यांनी सुरू असलेल्या योजनांची माहिती तसेच सदस्यांच्या सेस फंडातून घेण्यात येणार्या कामांची माहिती दिली.’
चौकट :
बाटली अन् पाच किलो चिवडा
मासिक सभा रंगात आली असताना, विसापूर येथील एक ज्येष्ठ माजी सैनिक अचानक सभागृहात प्रकटले. त्यांनी त्यांच्या भागातील ट्रान्सफॉर्मर अनेक दिवस बंद असण्याबरोबर इतर अडचणी कथन केल्या. त्याचबरोबर वीज कंपनीच्या कार्यालय, गोडावून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी व्हिस्कीची बाटली अन् पाच किलो शेव-चिवडा आढळून आल्याचे तावातावाने सांगितले. त्यावर गटविकास अधिकारी काळे यांनी, तुमचा मुद्दा घेतला आहे. बाहेर जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे सांगत त्यांच्यासह वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना बाहेर जाऊन संबंधितांचे समाधान करण्याचा सल्ला दिला.