पोलिसांचा उपक्रम : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाहनधारकांना सुचना
बाळासाहेब रोडे
सणबूर : विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या हातात केवळ दंडाची पावती ठेवून न थांबता कोरोनापासून स्वत:सह इतरांनाही वाचविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देत त्यांच्यात जनजागृती करण्याचा उपक्रम ढेबेवाडी पोलिसांनी हाती घेतला आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे दंडात्मक कारवाईच्या भीतीबरोबरच ग्रामस्थांमध्ये जागरूकताही निर्माण होत आहे.
ढेबेवाडी, तळमावले यासह लहान-मोठ्या बाजारपेठांचा समावेश असलेल्या ढेबेवाडी विभागात गत काही महिन्यांपूर्वी कोरोनाने अक्षरश: कहर केला होता. अनेकांना त्यामध्ये जीवही गमवावा लागला होता. त्यावेळी विविध यंत्रणांसह येथील पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी उत्तम भजनावळे व त्यांचे सहकारी रात्रंदिवस रस्त्यावर गर्दीला शिस्त लावताना दिसायचे. मात्र, अलीकडे रुग्णसंख्या घटल्याने वाहनचालक व ग्रामस्थांनी पुन्हा मनमानी सुरू केली आहे. आता ठिकठिकाणी नव्याने बाधित रुग्ण वाढू लागल्याने आणि पुन्हा या खोऱ्यात कोरोनाने ‘एण्ट्री’ केल्याने खबरदारी म्हणून पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात व सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. मात्र, यावेळी त्यांच्या कारवाईच्या मोहिमेला जनजागृतीचीही किनार दिसत आहे. विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या हातात केवळ दंडाची पावती ठेवून न थांबता कोरोनापासून स्वत:सह इतरांनाही वाचविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना पोलीस देत आहेत.
- कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. नियमभंग होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ कारवाई करून उपयोग नाही. त्यांच्यात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळेच कारवाई करतानाच मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे महत्त्व आम्ही वाहनधारकांना पटवून देत आहोत.
- संतोष पवार
सहायक पोलीस निरीक्षक
- चौकट
निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा
कोरोना संसर्ग मध्यंतरी आटोक्यात आला होता. ढेबेवाडी विभागातही रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होती. त्यामुळे येथील कोरोना केअर सेंटरही बंद करण्यात आले. जनतेतही कोरोनाचे गांभीर्य राहिले नाही. कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळेच कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असून, पूर्वीप्रमाणेच नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
फोटो : १६केआरडी०२
कॕॅप्शन : ढेबेवाडी पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असून, जनजागृतीवरही भर देण्यात आला आहे.