मायणी : येरळा नदीवर असलेला अंबवडे-गोरेगाव फरशी पूल गत दोन महिन्यांपूर्वी वाहून गेला आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला, तरीही अजून या पुलाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीला मंजुरी असूनही ग्रामस्थ पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या पुलाचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गत दोन महिन्यांमध्ये खटाव तालुक्याच्या दक्षिण, उत्तर भागात पाऊस पडला. या पावसामुळे खटाव तालुक्याची जलवाहिनी असलेली येरळा नदी दुतर्फा भरून वाहू लागली. या नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे नदीवर असलेला मध्यम प्रकल्प तसेच लहान-मोठे सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.
येरळवाडी (ता. खटाव) याठिकाणी असलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात पाण्याची आवक वाढू लागल्याने या नदीपात्रात असलेला अंबवडे-गोरेगाव तसेच मोराळे निमसोड हे दोन्ही पूल गतवर्षी वाहून गेले, तसेच या पुलावरून सुमारे एक महिन्याहून अधिक काळ पाण्याचा प्रवाह चालू होता. या पाण्याच्या प्रभावामुळे मोराळे-निमसोड मार्गावरील पुलावर २०१९ मध्ये जेवढा भाग वाहून गेला होता. तेवढाच भाग यावर्षी वाहून गेला व आता तेवढी दुरुस्ती केली.
आंबवडे-गोरेगाव मार्गावरील पूल हा जवळपास निम्मा वाहून गेला. त्यामुळे या ठिकाणीची पूर्ण वाहतूक बंद झाली. पुलाजवळच थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र आज नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जवळजवळ बंद झाला आहे. या भागातील ग्रामस्थ नदीपात्रातून ये-जा करत आहेत. या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
चौकट..
नदीपात्रातून ये-जा करण्यासाठी कसरत..
अद्याप पुलाची दुरुस्ती सुरू झाली नसल्याने या परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालक आजही प्रतीक्षेत आहेत. नदीच्या पात्रातून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने यावर्षी पुलाचे लवकर बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
०२मायणी पूल
येरळानदी पात्रात असलेला अंबवडे-गोरेगाव अशाप्रकारे वाहून गेला आहे. (छाया : संदीप कुंभार)