फलटण : सांगली येथे २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महामेळाव्यास फलटण येथून हजारोच्या संख्येने समाजबांधव सामील होणे गरजेचे आहे,’ असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी केले.
फलटण तालुक्यातील ओबीसी समाजाच्या प्रमुख नेतेमंडळींची बैठक माजी नगरसेवक मिलिंद नेवसे यांच्या कार्यालयात पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद आप्पा नेवसे, श्रीराम कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन बजरंग खटके, भाजपचे बजरंग गावडे, दादासाहेब चोरमले, नगरसेवक अजय माळवे, माजी उपसभापती विवेक शिंदे, सरपंच मनीष जाधव, निजामभाई आतार, आमीर शेख, सहदेव शेंडे, अंबादास दळवी, रियाज इनामदार, किशोर तारळकर, सुभाषराव भांबुरे, किरण बोळे, बापूसाहेब काशीद, जगन्नाथ कुंभार, बाळासाहेब ननावरे, सोपानराव जाधव, उद्धव बोराटे, विजय मायने आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब शेंडे म्हणाले, ‘ओबीसी समाजाच्या हिताच्या आड जर कोणी येणार असेल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आमची तयारी आहे.
ओबीसी समाजाच्या न्याय हक्क मागण्यांसाठी २७ फेब्रुवारी रोजी सांगली येथे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ओबीसी समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री संजय राठोड, खासदार राजीव सातव, माजी मंत्री विनयजी कोरे यांच्यासह ओबीसी समाजाचे आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
बैठकीप्रसंगी नेक मान्यवरांची भाषणे झाली. हजारोच्या संख्येने सांगलीच्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. मिलिंद नेवसे यांनी आभार मानले.