कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिका प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी काही नगरसेवक फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करीत असल्याचा आरोप कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आला आहे. याला त्वरित पायबंद घालावा आणि शासकीय यंत्रणेवर दबाव आणून कऱ्हाडात सुरू असलेले घाणेरडे राजकारण व लसीकरणात होणारा हस्तक्षेप थांबवावा, असे निवेदन कऱ्हाडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले आहे.
कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य अशोकराव पाटील, नगरसेवक इंद्रजित गुजर, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाला थोपविण्यासाठी साऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. मात्र, कऱ्हाड शहरात काही वेगळ्या प्रवृत्ती कार्यरत झाल्या आहेत. शासनाने राबविलेल्या कोरोना लसीकरण आपणच राबविल्याच्या आविर्भावात अनेक नगरसेवकांनी फ्लेक्स लावले आहेत. कऱ्हाडच्या जनतेसाठी काहीही करायचे नाही. शासनाने केलेल्या योजना आपल्या नावावर खपवायच्या असा वेगळाच पायंडा पाडणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित झालेले नगरसेवक शासनाच्या योजनांचा फायदा उठवत आहेत.
या सर्व राजकीय गोष्टींना आळा घालण्यासाठी व त्या नगरसेवकांनी लावलेले फ्लेक्स काढण्यासाठी आदेश द्यावेत. शासनाच्या योजना आम्ही राबवीत आहोत. असा खोटा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. सांघिक प्रयत्नात कोठेच नसताना केवळ पोस्टरबाजी करून शासकीय यंत्रणेवर दबाव आणून कऱ्हाडात सुरू असलेले घाणेरडे राजकारण व लसीकरणात होणारा राजकीय हस्तक्षेप वेळीस थांबवावा, अन्यथा काँग्रेसला या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान, कालच आपण फ्लेक्स बॅनर काढण्याचे आदेश दिले असून, सर्व ठिकाणचे फ्लेक्स काढले आहेत, अशी माहिती काँग्रेस शिष्टमंडळाला मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. दरम्यान, अशोकराव पाटील यांनी नऊ नंबर शाळेतील लसीकरणाचे केंद्र बंद करून लाहोटी कन्या शाळा येथे नवीन केंद्र सुरू करावे, अशी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली. नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी एक डॉक्टर व दोन नर्स आपण उपलब्ध करून देतो आपण लसीकरणाचे डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली. आपण जर डॉक्टर व नर्स पुरविणार असाल तर आपण म्हणाल तेथे लसीकरणाचे केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी हमी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शिष्टमंडळाला दिली.