सातारा : प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सोनगाव तर्फ, पिंपरी आणि वेळोशी येथील चौघांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. संतोष वांगडे, राहूल वांगडे, गणेश वांगडे, मनोहर सावंत, सुनील कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ येथील मनोहर बापू सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मनोहर सावंत यांच्या शर्टची बाही जळाली असून पोलिसांनी त्यांना वाचविले. जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपींना अटक केली नाही म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सुनील कर्णे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सुनील युवराज कांबळे (वय ३०, रा. वेळोशी, ता. फलटण) हा शेतकरी आहे. काही दिवसांपूवी त्याने दाखल केलेल्या जातीवाचक शिवीगाळ प्रकरणाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जात नसल्याचा त्याचा आरोप आहे. ''या प्रकरणातील आरोपींना अटक करा, अन्यथा मी जीव देतो,'' असे म्हणून त्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातील प्लास्टिक बाटलीमधून अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सातारा शहर पोलिसांना त्याला रोखले. याप्रकरणी सुनील कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कऱ्हाड तालुक्यातील पिंपरी येथील संतोष धोंडिबा वांगडे (वय ३८), राहूल मारुती वांगडे (वय २७) आणि गणेश पांडूरंग वांगडे (वय ४२) या तिघांनी ''आमचा पुनर्वसन सातबारा कोरा झाला पाहिजे आणि तो नाही झाला तर आम्ही आत्मदहन करुन आमचा जीव देणार,'' असे म्हणून मंगळवारी सातारा येथे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुरु असतानाच सातारा शहर पोलिसांनी त्यांना रोखले आणि त्या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले. पोलीस नाईक राहूल खाडे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एम. के. जाधव हे अधिक तपास करत आहेत.
फोटो: जावेद