सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध पोलीस स्टेशनअंतर्गत असणाऱ्या एका मोठ्या गावामध्ये एक मागासवर्गीय असहाय असे कुटुंब पालाच्या कुटीमध्ये राहत आहे. मिळेल ते काम करून आपले जीवन जगत असतानाच त्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर १४ फेब्रुवारी रोजी आघात होऊन तिला उपचारासाठी काॅटेज हॉस्पिटल, सातारा येथे दाखल केले. मात्र, आजअखेर आरोपी मोकाट असल्याने जिल्ह्यातच गृहराज्यमंत्री असतानासुद्धा या असहाय पीडितेला न्याय मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत खंडाईत यांनी दिली आहे.
पीडित कुटुंब अनेक दिवसांपासून मोलमजुरी करून आपले जीवनमान जगत असून कुटुंबामध्ये वयोवृद्ध आई आणि इयत्ता ५ वीत शिक्षण घेत असणारी मुलगी असे मागासवर्गीय कुटुंब एका पालात राहत आहे. या अल्पवयीन मुलीवर १४ फेब्रुवारीला अमानवी आघात झाल्याने पीडितेस कराड येथील कॉटेज हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि अचानक हॉस्पिटलमध्ये कोणताही डिस्चार्ज न घेता पीडितेस १५ फेब्रुवारीला औंध पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानंतर औंध पोलीस स्टेशनला १३ मार्च रोजी गुन्हा दाखल केल्याचे दिसून येते. या कालखंडात पीडित मुलीस व कुटुंबास कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. पीडितेस न्याय देण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी, जिल्हा साताराच्या वतीने मंगळवार, ६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीच्या मार्गाने प्रथम धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.