बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

By admin | Published: March 8, 2015 12:12 AM2015-03-08T00:12:44+5:302015-03-08T00:15:11+5:30

उदयनराजेंचा घणाघात : लोलकमंत्रिपद टिकवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घास घेतला हिरावून; खंडाळ्याचे पाणी परजिल्ह्याला देण्याचे घोर पाप

Ask Ramrajen for Baramati water! | बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

Next

सातारा : ‘दैव देते आणि कर्म नेते, हे कशाला म्हणतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीरा-देवघर प्रकल्पाच्या पाणी वाटप. प्रकल्प अहवालानुसार जर पाणीवाटप ठेवले असते तर बारामती आणि इंदापूरला पाणी मिळाले नसते. बारामतीला पाणी मिळाले नसते तर आपले लोलकमंत्रिपद राहिले नसते म्हणून पूर्वीच्या नियोजनावर बोळा फिरवून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढण्याचा कृतघ्नपणा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे. आता यांनाच लोकांनी जाब विचारावा,’ असा घणाघाती हल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्रिटिशकालीन भाटघर धरण व त्यानंतर बांधलेल्या वीर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या दुष्काळी तालुक्यांना नीरा डावा आणि उजव्या कालव्याद्वारे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के या प्रमाणात वाटप करण्याचे प्रकल्प अहवालानुसार नियोजित होते. परंतु, तत्कालीन कृष्णा खोऱ्याचे जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या अधिकारात नीरा-देवघर धरणातील पाण्याच्या वाटपाचे नियोजन बदलले. डाव्या कालव्याचे ४३ ऐवजी ६० टक्के आणि उजव्या कालव्याचे ५७ ऐवजी ४० टक्के नियोजन केले. त्यामुळे नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या खंडाळा, शिरवळ, फलटण या भागांतील व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येण्यापासून वंचित राहिल्या आहेत. नीरा-देवघर धरणाचा उजवा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा आहे. अद्याप फक्त ३५ किलोमीटरचेच काम झालेले आहे. या खात्याच्या पूर्वीच्या मंत्र्यांने या प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढची कामे रखडवून सोयीस्कररीत्या खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्यांना देण्याचे पाप केले.आता त्यासाठी मूळ नियोजनानुसार पाणी वाटपाचे फेर नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकल्प अहवालानुसार नीरा डाव्या व उजव्या कालव्याचे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के नियोजन पूर्ववतच करावे लागणार आहे.
पूर्वीच्या मंत्र्यांनी प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढील कामे त्यांनीच जाणीवपूर्वक रखडवून ठेवली. पाण्याचा वापर होत नाही म्हणून खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्यांना देण्याचे घोर पाप या लोकांनी केले आहे. या कर्मदरिद्री नियोजनाचा जाब आता शेतकऱ्यांनी त्यांना विचारला पाहिजे,’ असेही उदयनराजेंनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता म्हटले आहे.
स्वार्थांध व्यक्तींनी नियोजन बदलले...
खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी या उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे जवळपास २१ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परंतु, दुर्दैवाने स्वार्थांध व्यक्तींनी पाणी वाटपाचे नियोजन बदलले. या योजनांस निधी उपलब्ध होत नाही. यामळे सर्व कामे प्रलंबित आहेत. गेल्या पाच वर्षांत नीरा-देवघर प्रकल्पासाठी १०८ कोटींचा निधी मिळाला. परंतु, ही कामे पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची गरज आहे. हा निधी मिळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Web Title: Ask Ramrajen for Baramati water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.