दहिवडी : आंधळी येथे झालेल्या कुस्तीतील रोमहर्षक प्रथम क्रमांकाच्या लढतीत कोल्हापुरच्या मोतिबाग तालीमचा पैलवान असलेल्या अमोल फडतरे याने शिवछत्रपती पुरस्कार विजेता मुंबई महापैर केसरी पैलवान ज्ञानेश्वर गोचडे याला २२ व्या मिनिटांला घिस्सा डावावर अस्मान दाखवून एक लाख अकरा हजार १११ रुपयेचे बक्षीस पटकाविले.माण तालुक्यातील आंधळी येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे, आॅल इंडिया चॅम्पियन विकास गुंडगे, ‘शिवछत्रपती’ पुरस्कार विजेता उमेश सूळ, वस्ताद भालचंद्र पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन नितीन राजगे व शौकिनांच्या अलोट गर्दीत पार पडलेल्या या मैदानात रोमांचक लढती पाहण्यास मिळाल्या. द्वितीय क्रमांकाच्या लढतीत पैलवान देविदास घोडके जखमी असल्यामुळे पैलवान भारत मदने यास विजयी घोषित केले. पैलवान पांडुरंग मांडवे याने पोकळ घिस्सा डावावर पैलवार औदुंबर मासाळ याला चितपट केले. पैलवान प्रशांत शिंदे याने अमोल जाधव यास हप्ता डावावर पराभूत केले. पैलवान विकास राजगे यास वैजनाथ खताळ विरुद्ध गुणांवर विजयी घोषित केले. पैलवान शरद पवार याने पैलवान अमोल केचे यास पलटी डावावर अस्मान दाखविले. भूषण सूर्यवंशी याने पृथ्वीराज भांड यास रोमहर्षक लढतीत पराभूत केले. या प्रमुख कुस्त्यांबरोबरच तब्बल शंभरांवर कुस्त्या मैदानात झाल्या. पैलवान युवराज केचे व पैलवान भागवत यांच्या ओघवत्या समालोचनामुळे व हलगीच्या कडकडाटामुळे मैदानात चांगलीच रंगत भरली. (प्रतिनिधी)लक्षवेधक कुस्तीमहिला कुस्तिगीर उमा कर्चे व मोनाली गायकवाड यांची कुस्ती विशेष लक्षवेधक ठरली. ग्रामीण भागात प्रथम झालेली ही कुस्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्याचबरोबर या मैदानात हजारो कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली होती. याठिकाणी अनेक रंगतदार कुस्त्या कुस्तीप्रेमींना पाहता आल्या.
घिस्सा डावावर अमोलची ज्ञानेश्वरवर मात
By admin | Updated: November 15, 2015 23:43 IST