सातारा : १४ व्या वित्त आयोगातील व्याज आणि अखर्चित रकमेतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. तसेच याच सभेत अध्यक्ष उदय कबुले यांनी, मंजूर कामावरील पैसे ३१ मार्चपूर्वी खर्च करावेत, अशी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केली.
येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्थायी आणि जलव्यवस्थान समितीची विशेष सभा झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतीचे अविनाश फडतरे, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ, भीमराव पाटील, दीपक पवार, सुवर्णा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.
मागील आठवड्यापूर्वी स्थायी समितीची सभा झाली होती. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निर्णय घेण्यात आले नव्हते. त्यामुळे शुक्रवारी स्थायी समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली, तर १४ व्या वित्त आयोगातील व्याज आणि अखर्चित रक्कम जवळपास सहा कोटींवर आहे. या पैशातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन मान्यतेने जिल्ह्यातील लोकांसाठी औषधांवर हे पैसे खर्च करण्यात येणार होते. पण, कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असल्याने हे पैसे लोकांच्या आरोग्य सेवेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या मान्यतेने या पैशातून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुसज्ज अशा रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय घेण्यात आला. तसेच याच सभेत जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील पदोन्नती करण्याबाबत सूचना करण्यात आली.
३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे मंजूर कामे पूर्ण करावीत. तसेच कामावरील पैसे एप्रिलपूर्वी खर्च करावेत, अशी सूचना अध्यक्ष उदय कबुले यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच याच सभेत विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली.
चौकट :
जलव्यवस्थापनमध्येही आढावा...
स्थायी समितीच्या सभेपूर्वी जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. यामध्ये विविध कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच नवीन काही कामांवरही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपली असल्याने एप्रिलपूर्वी कामांवर पैसे खर्च करावेत, अशी सूचनाही संबंधित विभागाला करण्यात आली.
..........................................................