सातारा - ‘धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून लाखो विद्यार्थी भारतात येतात. या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांचे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत,’ अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी जिल्हा परिषद सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश घेऊन त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अॅड. आंबेडकर बोलत होते.अॅड. आंबेडकर म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेथे-जेथे गेले तेथे मी जात आहे. डॉ. बाबासाहेब यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. या शाळेत येऊन मी भावूक झालो.’निवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे, समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक प्रमोद फडणीस, प्रवीण धस्के, शिक्षण विस्तार अधिकारी देशमाने, प्रकाश कांबळे, राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबासाहेबांचे सर्व साहित्य एका छताखाली हवे, भीमराव आंबेडकर यांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 6:06 AM