दशरथ ननावरे
खंडाळा : आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रगतीचा नवा मार्ग शोधता येतो. पण दुर्गम भागात डोंगरमाथ्यावरील जंगलात राहणारे अनेक लोक यापासून कोसो दूर आहेत. वनदुर्ग असलेल्या कमळगडाच्या पायथ्याशी काही कुटुंबे गेली तीन पिढ्यांपासून अंधारात आहेत. या लोकांच्या जीवनात प्रकाशाचा नवा मार्ग प्रज्वलित करण्यासाठी खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने प्रत्येक घरात सौरऊर्जा विद्युत यंत्र भेट दिली. त्यामुळे दुर्गम भागातील या लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर झाल्याने समाधानाची भावना निर्माण झाली.
सह्याद्रीच्या डोंगररांगातील कडेकपाऱ्यातून, घनदाट अरण्यातून आणि बळकट गडकिल्ल्यांतून छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक ठेवा प्रत्यक्ष पाहण्याचा ध्यास घेऊन इतिहासाचा संपन्न वारसा जपण्यासाठी खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्स सातत्याने प्रयत्न करीत असते. या ग्रुपने कमळगड ते कोळेश्वर असा ट्रेक निवडक सभासदांसह आयोजित करून भटकंती केली.
सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यातून भटकंती करणे म्हणजे अनोखा आनंद असतो. हा आनंद एका दिवसासाठी छान वाटतो. वर्षानुवर्षे डोंगरावरील जंगलात राहणे म्हणजे मोठे दिव्य आहे. त्यातही विजेची कोणतीही सोय नसताना अंधाराला कवटाळून राहताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कमळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या धनगरवस्ती व जंगमवस्ती येथे चार कुटुंबे राहतात. रात्रीच्या वेळी त्यांना उजेडाची सोबत मिळावी यासाठी या ग्रुपने प्रत्येक घरासाठी एक सौरऊर्जा यंत्र बसवून दिले.
चौकट
पशुपालनावर गुजराण
डोंगरातील दुर्गम भागात राहणारे लोक बिकट परिस्थितीत राहतात. म्हैस, गाई पालन करून त्यांच्या दुधावरच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. जंगलातील रानभाज्या आणि नाचणी, तांदळाच्या भाकरी हाच त्यांचा आहार आहे. पावसावर आधारित शेतीतून मिळणारे उत्पन्नच त्यांना आधार वाटतो.
कोट
गडकोट ट्रेकिंगमधून प्रत्येक गडावर या ग्रुपच्या माध्यमातून सफाई मोहीम राबवली जाते. गडावरील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा व इतर कचरा जमा करून तो मोठ्या पॉलिथीन पिशव्यातून भरून गडाखाली आणून त्याची योग्य निचरा केला जातो. त्यामुळे स्वच्छतेचा ध्यास घेऊन केलेल्या कामामुळे किल्ल्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते. त्यातच इथल्या दुर्गम भागातील लोकांच्या घर प्रकाशित करता आल्याचे मोठे समाधान वाटते.
- श्रीपाद जाधव,
संस्थापक, शिवसह्याद्री पायदळ
शिवसह्याद्री संघटनेने आमच्या व्यथा जाणून सूर्याच्या प्रकाशावर चालणाऱ्या लाईटची सोय केली. गेल्या तीन पिढ्या आम्ही इथंच राहतोय. गडावर अनेक फिरस्ती लोक येतात. गड बघून निघून जातात. पण या ग्रुपने आमच्या घरात उजेड पडावा म्हणून चांगली सोय केली.
- शंकर डोईफोडे, धनगरवस्ती.
फोटो २२खंडाळा
पिढ्यानपिढ्या अंधारात चाचपडत असलेल्या कमळगडाच्या पायथ्याशी काही कुटुंबांना शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सच्या जवानांनी सौरऊर्जेवर चालणारी यंत्रे भेट दिली.