शेखर जाधव - वडूज -पंधरा दिवसांपूर्वी आजी गेली. तिच्या विरहानं अकरा वर्षांची चिमुकली एकटी झाली. याच विरहवेदनेमुळं तिनं घर सोडलं खरं; पण त्यानंतरचा तिचा दिवसभराचा प्रवास तिची कसोटी पाहणारा ठरला. रहिमतपूर येतील कन्या प्रशालेमध्ये सातवीत शिकणारी ऊर्मिला शरद कुंभार हिला एकूण पाच बहिणी. दोघींची लग्नं झालेली. एक बहीण शुभांगी बारावीत शिकतेय. दुसरी कोमल नववीत आहे. या तिघींच्यांत किरकोळ कारणावरून नेहमी भांडणे व्हायची. सर्वांत लहान ऊर्मिला असल्यामुळे थोरल्या दोघी तिला रागवायच्या. त्यावेळी लाडकी आजीच ऊर्मिलाची बाजू आजी घ्यायची. अशी आजी अचानक जगातून निघून गेल्यामुळं ऊर्मिलाला घरात एकटं वाटू लागलं. आता आपली बाजू घेणारं कुणी नाही, असा विचार तिच्या मनात येऊ लागला.रविवारी (दि. ९) सकाळी ९ वाजता डब्यात साठविलेले १४० रुपये घेऊन ती रहिमतपूरहून वडूजला जाणाऱ्या एसटीत बसली. बसमध्ये कुणी ओळखणारं भेटलंच तर त्याला सांगायला बरीच कारणं तिनं तयार ठेवली होती. परंतु बसमध्ये ओळखीचं कुणीच नव्हतंं. कुठं जायचं, हे निश्चित नसतानाही तिनं हे पाऊल उचललं होतं. आपल्या नशिबी पुढे काय आहे, हेही तिला ज्ञात नव्हतं. इकडे आई-वडील ,दोन बहिणी आणि नातलग तिचा शोध घेऊ लागले.रिक्षाचालकाला हा प्रकार वेगळा असल्याचा संशय आल्याने त्याने रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. हवालदार शांताराम आेंबासे यांना ऊर्मिलेची कहाणी रिक्षावाल्याने सांगतिली. ‘आम्ही सर्वजण गेल्या महिन्यापासून इथेच राहतो. वडील सातारला पेट्रोलपंपावर कामाला असतात,’ असं ऊर्मिलानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी विचारल्यावर पूर्ण नावही सांगितलं. ‘माझी बहीण खटाव कालेजमध्ये अकरावीत शिकत असून तिने मला घरी जाण्यास सांगितलंय; पण मला घर सापडेना,’ असं ती म्हटल्यावर पोलिसांनी तत्काळ खटाव कालेज गाठलं. परंतु रविवार असल्याने कालेजला सुटी होती.मग मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा तिने मावशीबद्दल आणि साताऱ्यात राजवाड्याजवळ पडकं घर असल्याचं सांगितलं. त्या दिशेनंही पोलिसांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर संपर्क साधला; पण हाती काहीच लागेने. नंतर महिला पोलीस आशाताई काळे यांनी तिला नाष्टा आणून दिला आणि पुन्हा चौकशी केली. ही मात्राही लागू न झाल्यानं ठाणे अंमलदार धनाजी वायदंडे यांनी तिला पेन दिलं आणि ‘तुला आठवेल तो मोबाइल नंबर लिही’ असं सांगितलं. कागदावर तिने भरकन वडिलांचा नंबर लिहिला आणि अखेर ती रहिमतपूरच्या शरद कुंभार यांची मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. रहिमतपूरहून रात्री उशिरा ऊर्मिलाचे वडील आणि नातलग आले. पोलीस ठाण्यातले सोपस्कार उरकून ऊर्मिलाला घेऊन गेले. जाता-जाता पोलीस कर्मचारी शांताराम ओंबासे, धनाजी वायदंडे एवढंच म्हणाले... ‘नशीब बलवत्तर म्हणूनच ती ऊर्मिला वडूजमध्ये आली.’ मुला-मुलींचे अपहरण होण्याच्या घटना वाढत असताना ऊर्मिलाने उचललेले हे पाउल आत्मघातकीच म्हणावं लागेल. सुमारे तीस हजार लोकवस्ती असलेल्या वडूजनगरीचा बसस्थानकावर ऊर्मिला सकाळी ११ वाजता पोहोचली आणि रिक्षाकडे धावली. रिक्षावाल्याने ‘कुठं जायचंय’ विचारलं असता ‘सरळ चला’ असं तिनं सांगितलं. रिक्षा कर्मवीरनगरमध्ये आली तेव्हा रिक्षाचालकाने पुन्हा विचारलं. नेमकं उत्तर न मिळाल्याने संभ्रमावस्थेत सापडलेल्या रिक्षाचालकाला हा प्रकार वेगळाच असल्याची चाहूल लागली.
आजीच्या विरहानं तिनं घर सोडलं; पण...
By admin | Updated: August 11, 2015 00:01 IST