वडूज : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन कडक केला आहे. मात्र काहीजण विनाकारण रस्त्यावर घिरट्या घालत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानंतर खटावचे परिवीक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतः रस्त्यावर येऊन अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर दंड करत काही वाहने सात दिवसांसाठी जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडूज शहरात परिवीक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनी मुख्य मेट्रो चौकात थांबून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांकडे चौकशी केली. यामध्ये विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली तर काही वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जप्त केली आहेत. ही वाहने सात दिवसांसाठी जप्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितली.
यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर, वाहतूक कर्मचारी सचिन काळे, नितीन लोखंडे यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईत १५ दुचाकी, दोन चारचाकी वाहने सात दिवसांसाठी जप्त करण्यात आली आहेत तर एका चारचाकी वाहनात प्रमाणापेक्षा जास्त लोक प्रवास करीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्या वाहनधारकावर तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
चौकट :
विनाकारण रस्त्यावर येऊ नका....
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, प्रशासन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणी बाहेर पडू नये, अशा सूचना आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास आपणाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
-जनार्दन कासार, परिवीक्षाधीन
प्रांताधिकारी (खटाव)
०९वडूज
फोटो: वडूज येथील मुख्य रस्त्यावरील चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई करताना परिक्षाविधीन प्रांताधिकारी जर्नादन कासार तहसीलदार किरण जमदाडे व इतर ( शेखर जाधव )