नीलेश सोनवलकर :: दुधेबावी फलटण, माण तालुक्याच्या सीमा रेषेवरील फलटण तालुक्यातील पूर्व भागातील एक प्रमुख केंद्र असलेले गाव म्हणून दुधेबावी गावाची ओळख आहे. गावालगतच शंभूमहादेव डोंगररांगा लगतच मोगराळे घाट असून, हा फलटण सांगली राज्यमार्ग या मार्गावरून जातो. या भागामध्ये सोनवलकरांची सहा गावे असल्याने या भागात सात गावांमध्ये सोनवलकरांची पाटीलकी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दुधेबावी गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी याच गावातील उमेदवार उभा केला जातो. दुधेबावीमधून याअगोदर पंचायत समितीमध्ये सुनंदा सोनवलकर, प्रा. सुभाष सोनवलकर हे निवडून गेले आहेत. तर सध्या कोळकी गटामधून माणिकराव सोनवलकर निवडून येऊन जिल्हा परिषद अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत.दुधेबावी हे नाव गावाला दुधेश्वर या शंकाराच्या अवतारावरून पडले आहे. दुधेश्वराचे मोठे मंदिर गावामध्ये असून, महाशिवरात्रीला मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो. पूर्वी गावामध्ये दुष्काळ पडला असता गावकरी संपूर्ण मंदिर दुधाने भरत असत. मंदिर तळघरात असल्याने दुधाने भरू शकतो आणि मोठा कार्यक्रम घेऊन दुधेश्वराला अभिषेक घातला जाई. त्यानंतर मुसळधार पाऊस पडत असे. हा गावचा इतिहास आहे. गावामध्ये एकच मुस्लीम कटुंब राहते. परंतु त्यांसाठी मशिद बांधून दिली आहे. गावामध्ये महालक्ष्मी, भैरवनाथ, बिरोबा व भवानीमाता यांच्या यात्रा भरवल्या जातात.माणिकराव सोनवलकरांमुळे गावाचे नाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्धीस आले आहे. त्यांनी पद मिळाल्यापासून गावामध्ये विकास कामांचा धडाका आहे. यामध्ये ग्रामपंचायत नवीन इमारत, सुमारे पाच समाजमंदिरे व पाणलोट बंधारे, पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन, दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना विविध योजना मिळवून देणे. गावामधील विविध अडचणी सोडवणे, विविध ठिकाणी पूल बांधणे, मशिदीची दुरुस्ती आदींसह विविध कामे करून त्यांनी गावाच्या नावलौकिकामध्ये भर टाकली आहे.दुष्काळी गाव म्हणून शिक्का बसलेले गाव धोम-बलकवडी योजनेमुळे पुसले जाणार आहे. हे काम प्रगतिपथावर असून, लवकरच हे पाणी गावामध्ये पोहोचणार आहे. गावातील बरेच तरुण सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान दुधेबावी ही सामाजिक कार्य करणारी संस्था गावामध्ये कार्यरत आहे. दुधेबावीत शंभू-महादेव डोंगर रांगावर श्री भवानी मंदिर, तातमगिरी मंदिर अगदी टोकावर बांधले आहे. गावामध्ये राष्ट्रवादी, रासप, काँग्रेस पार्टी हे पक्ष कार्यरत आहेत. गावामध्ये प्राथमिक केंद्रशाळा असून, माध्यमिक शाळा आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळालेपासून जवळपास सर्वच कामे केली असून, आता फक्त धोम-बलकवडीच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला असून, तेही काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच दुधेबावीमध्ये पाणी लवकरात-लवकर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.-माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद अध्यक्षदुधेबावी गावात सर्वांगीणदृष्ट्या सुधारणा होत चालली आहे. फक्त धोम-बलकवडीच्या पाण्याची गरज पूर्ण झाली पाहिजे. ते काम युद्धपातळीवर सुरू असून, पाणी आल्यानंतर गावचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.-विकास सोनलवकर, दुधेबावीप्रशासनामध्ये गावचा वाटादुधेबावी गावचा प्रशासनातील वाटा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. गावातील दिनकर सोनवलकर मंत्रालयात जलसंपदा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. तसेच पोलिस उपनिरीक्षक सुमारे ६ ते ७ आहेत. तसेच पोलिस कॉन्स्टेबलची संख्या सुमारे ५० पेक्षा जास्त मुंबई शहरात कार्यरत होते. तसेच शिक्षक, ग्रामसेवक, क्लार्क, तलाठी, कृषी सहायक, वायरमन आदी पदावर बरेच उमेदवार कार्यरत आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये गावताील तरुण कार्यरत आहेत. तसेच गवंड्यांचे गाव म्हणून दुधेबावी नावारूपाला येऊ लागले आहे. फलटण, खंडाळा, माण, खटाव या भागात गावातील गवंडी काम करतात. गावातील पाच महिला पोलिस पदावर कार्यरत आहेत. अगोदर वायरमनची संख्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने मेंढपाळांची संख्या आजही गावात मोठ्या प्रमाणात आहे. काही शेतकऱ्यांनी मेंढपाळ व्यवसाय फायदेशीर असल्याने नव्या जोमाने पुन्हा सुरू केला आहे.
प्रशासन अन् राजकारणात अव्वल ठरतेय दुधेबावी
By admin | Updated: March 23, 2016 00:35 IST