सातारा: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पोलिसांनी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी दिवसभरात ७३ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई तीव्र करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्बंध कडक केले आहेत. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून विनापरवाना नामकरण विधी सोहळा आयोजित करण्याचा प्रकार घडला आहे. या विधीला उपस्थित महिलाही विना मास्क होत्या. शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी विनामास्क १६ जणांकडून आठ हजार, तर दोन दुकानदारांकडून नऊ हजार दंड वसूल करण्यात आला.
बुधवार नाका नालंदा समाजमंदिर येथे आकाश भरत खरात (वय २५, रा. बुधवारपेठ सातारा) यांनी सुमारे ४०-४५ महिलांचा जमाव जमवून नामकरण विधी सोहळा साजरा केल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आले. विधीस हजर असलेल्या महिला व लहान बालके, पुरुष असे विनामास्क असल्याचे आढळून आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार नामकरण विधी आयोजित करणाऱ्या आकाश खरात याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चाैकट : दुचाकी चालकांची धावपळ..
पोलिसांनी शहरात आणि परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. शनिवारी दिवसभरात ७३ विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. अचानक पोलिसांनी ही कारवाई सुरू केल्याने वाहन चालकांची धावपळ उडाली. पोलिसांपासून बचाव होण्यासाठी काहीजणांनी तात्पुरता तोंडाला रूमाल बांधला. कोरोना आटकावासाठी पोलिसांनी साध्या वेशातील टीम तैनात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनामास्क घराबाहेर पडू नये.