सातारा : गेल्यावर्षी मार्चमध्ये येथील माजगावकर माळ झोपडपट्टीत झालेल्या महिलेच्या खुनाबद्दल आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेले अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी बुधवारी हा निकाल दिला.शंकर सुरेश भिंगारदेवे (वय ५५, रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ३१ मार्च २०१५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या शेजारी राहणाऱ्या रेणुका सुभाष पवार (३५) या महिलेशी त्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने घरी जाऊन सुरा आणला आणि रेणुकावर सुमारे दहा वार करून तिचा निर्घृण खून केला, असा आरोप त्याच्यावर होता. रेणुकाच्या पोटावर, छातीवर, गळ्यावर, पाठीवर सुऱ्याचे वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी याच झोपडपट्टीतील दोघे भाऊ पुढे सरसावले होते. संजय बबन बाबर (२५) आणि अमोल बबन बाबर (२०) अशी त्यांची नावे आहेत. आरोपीने त्यांच्याही पाठीवर आणि पोटावर वार केल्याचा आरोप होता. या प्राणघातक हल्ल्यात दोघेही जबर जखमी झाले होते. न्यायालयाने खुनाबद्दल जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्राणघातक हल्ल्याबद्दल पाच वर्षे सक्तमजुरी, सहा हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास दीड वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. आरोपी शंकर भिंगारदेवे याने दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. याप्रकरणी आरोपीची भाची माधवी प्रमोद भंडारे (२५, रा. माजगावकर माळ झोपडपट्टी) हिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे आणि पुष्पा किर्दत यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानला. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. पेहरवी विभागाचे उपनिरीक्षक अविनाश पवार, रेहाना शेख, शशिकांत भोसले, नंदा झांजुर्णे, अजित शिंदे, कांचन बेंद्रे, शमशुद्दीन शेख, नीलम सूर्यवंशी, आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)नुकसानभरपाईचे आदेशआरोपी शंकर भिंगारदेवे याला खुनाच्या गुन्ह्यात दहा हजार रुपये, तर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात सहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.दहा हजारांमधील सहा हजार रुपये मृत रेणुका पवार यांचा मुलगा ओम याला भरपाई म्हणून द्यावेत तसेच सहा हजार रुपये दंडातील प्रत्येकी अडीच हजार रुपये दोन्ही जखमींना भरपाई म्हणून द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.
महिलेच्या खुनाबद्दल आरोपीस जन्मठेप
By admin | Updated: March 16, 2016 23:49 IST