लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येचा उतरताक्रम सुरू असताना दुसरीकडे डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण सातत्याने वाढू लागले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात डेंग्यूचे ३११, तर चिकुनगुनियाचे ३२२ असे ६३३ रुग्ण सक्रिय आहेत. सातारा व कऱ्हाड तालुक्यात बाधितांची संख्या अधिक असल्याने हिवताप विभागाने या तालुक्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार डोके वर काढतात. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असे रुग्ण वारंवार आढळून येत आहेत. जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, पाटण व फलटण या तालुक्यांत डेंग्यू व चिकुनगुनिया बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. या तालुक्यांमधील ठराविक भागात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ पसरली असून, नागरिक ताप, थंडी, सांधेदुखी, थकवा अशा आजारांनी त्रस्त झाले आहेत. कोरोना व डेंग्यूची लक्षणे एकसारखीच असल्याने शासकीय व ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तसेच रक्त तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत आहे.
दरम्यान, ज्या भागात डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहे, त्या भागात जिल्हा हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडून तातडीने सर्व्हे केला जात आहे. येथील पाण्याचे पिंप, रांजण, फ्रीज, कूलर, भंगार व इतर साहित्यांची पाहणी करून डेंग्यू अळ्या नष्ट केल्या जात आहेत. हिवताप विभागाने जिल्ह्यात डेंग्यू व चिकुनगुनियाच्या ६३३ रुग्णांची नोंद केली असून, यापैकी काही रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना पाठोपाठ डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
(चौकट)
सर्व्हेसाठी आशा सेविकांची पथके
जिल्हा हिवताप विभागाकडून सातारा शहरात घर-टू-घर सर्व्हे केला जाणार आहे. यासाठी १९ आशा सेविकांच्या पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाला डेंग्यू व चिकुनगुनियाचा सर्व्हे कसा करावा, नागरिकांमध्ये प्रबोधन कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी दिली.
(कोट)
डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया हे आजार कसे बळवतात, त्यांना कसे रोखावे, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती ऑडिओ व व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून नागरिकांना दिली जात आहे. पालिकेच्या घंटागाडीवर ही ध्वनिफीत सुरू करावी, अशी मागणी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली आहे.
- अश्विनी जंगम, जिल्हा हिवताप अधिकारी
(चौकट)
जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशी
तालुका डेंग्यू चिकुनगुनिया
सातारा १०६ १०७
कोरेगाव ३ ३
जावळी २ ४
कऱ्हाड ३४ १२५
पाटण १५ १५
फलटण १६ १६
खटाव ४ ८
ग्रामीण २१० २७८
शहरी ४३ ४४
एकूण ३११ ३२२