वाई : डॉल्बीच्या दुष्परिणामांबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठविल्यानंतर जिल्ह्यातील विविध गावांनी ‘डॉल्बी’ हद्दपार केली. तर अनेक गावे डॉल्बीमुक्तीच्या वाटेवर आहेत. वाई तालुक्यातही यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करण्याचा निर्धार पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत करण्यात आला.वाई येथे मंगळवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव मंडळांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, पोलीस निरीक्षक रमेश गंलाडे, उपनिरीक्षक प्रकाश खरात, नगरपालिका आरोग्य अधिकारी नारायण गोसावी, नगसेवक अनिल सावंत, डॉ़ अमर जमदाडे, महेंद्र धनवे, दीपक ओसवाल, काशीनाथ शेलार, धनंजय मलटणे, किरण खामकर, प्रवीण जाधव, पप्पू हगीर, धनजंय कारळे, डॉ़ मकरंद पोरे, आनंद पटवर्धन, शहरातील गणेशमंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.पारंपरिकवाद्यांचा वापर करून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी केले. पोलीस निरीक्षक रमेश गंलाडे म्हणाले, ‘डॉल्बी जिल्हा बंदी करण्यासाठी शासन पातळीवर हालचाली चालू आहेत. याची नोंद सर्व मंडळांनी घ्यावी़ मंडळांना यावर्षी शासनाने शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत देखावे सादर करण्याची परवानगी दिली आहे़ मंडळाच्या मंडपाचा आकार नियमानुसार असावा़ आक्षेपार्ह देखावे न दाखविता समाज प्रबोधनाचे देखावे सादर करावेत़ धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसणाऱ्या मंडळांना वर्गणी गोळा करता येणार नाही. तशा आशयाची तक्रार आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.’गणेशोत्सव काळात ट्रीपल सीट, भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहेत. ‘एक वार्ड एक गणपती’ ही योजना जास्तीत जास्त मंडळांनी अंमलात आणावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले़ या बैठकीत अनिल सावंत, महेंद्र धनवे, काशीनाथ शेलार, आनंद पटवर्धन, दीपक ओसवाल यांनी मंडळाच्या वतीने प्रशासनाला सूचना केल्या़ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार गणेश मंडळांचे कार्यकर्ते व प्रशासनाने यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करण्याचा निर्धार केला. (प्रतिनिधी)डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहे. यामुळे ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते़ शहरातील मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सवाचे पावित्र्य राखवे व शहरातून डॉल्बी हद्दपार करून जिल्ह्यास एक नवा आदर्श घालून द्यावा.- भूषण गायकवाड, नगराध्यक्ष... अन्यथा कायदेशीर कारवाई शासनाच्या धोरणानुसार गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहे़ यामध्ये सर्वात प्रथम डॉल्बीसाठी आवाजाची मर्यादा आसणार आहे. मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर व डॉल्बी मालकांवर कायदेशीर कार्यवाही करून दंड आकरण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला. वाई शहरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे़ समूह संस्थेच्या वतीने मंडळांमध्ये पर्यावरणपूरक देखावे सादर करणाऱ्या मंडळांना पारितोषिक दिले जाईल़ - आनंद पटवर्धन, संचालक समूह संस्था, वाई
अनधिकृत पार्किंगमुळे अपघात !
By admin | Updated: August 26, 2015 22:40 IST