वाई : ‘देशभक्त किसन वीर यांनी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचे जिल्ह्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्य व्हावे म्हणून विविध सामाजिक व शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे आचार-विचार नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शक ठरत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात देशभक्त किसन वीर यांच्या जयंती समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, संगीता मस्कर, रंजना डगळे, नगराध्यक्ष अनिल सावंत, महादेव मस्कर, दिलीप बाबर, सत्यजित वीर, कांतीलाल पवार, लक्ष्मण पिसाळ, शशिकांत पवार, रमेश गायकवाड, राजाभाऊ सोनावणे, चरण गायकवाड, प्रदीप जायगुडे, अमोल कदम, कुमार जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी निवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी याच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे घर - गाव व माझी शाळा’ या भित्तिपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.
पाटील म्हणाले, ‘किसन वीर आबाचे व्यक्तिमत्त्व साधी राहणी, स्वच्छ चारित्र्य, शिस्त व करारीपणा असे होते. त्यांनी
सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून दूरदुष्टीचे समाजकारण व राजकारण केले. शेतीला पाणी मिळावे यासाठी धोम धरण तसेच जिल्हा बँक, साखर कारखाना, जनता व यशवंत शिक्षण संस्था तसेच विविध सहकारी संस्थांची उभारणी केली.
प्रतापराव भोसले, लक्ष्मण पाटील, मदन पिसाळ, के. बी. जमदाडे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडविले. जिल्हा बँकेचा कारभार करताना आबांनी लावलेली आर्थिक शिस्त व शिकवण यामुळे आज बँकेला नाबार्ड व बॅंकिंग क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे ऋण कधीही विसरता कामा नये. आजच्या पिढीला राजकारण व समाजकारण काय हे समजले पाहिजे. त्यासाठी आबांचे विचार मार्गदर्शक ठरतील. स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संस्थामधील पदे ही केवळ मिरविण्यासाठी किंवा उपभोग घेण्यासाठी नसतात, तर त्याचा वापर समाजातील गोरगरीब, उपेक्षित व सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सदस्य अनिल जगताप, मधुकर भोसले, सुनीता कांबळे, रजनी भोसले, प्रभारी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, साईनाथ वाळेकर यांनी स्वागत केले. सभापती संगीता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांदर सूत्रसंचालन केले. उपसभापती विक्रांत उर्फ भैेया डोंगरे यांनी आभार मानले.