आटपाडी : स्थळ आटपाडीतील बचत धामसमोरील पटांगण... वेळ - दुपारी साडेतीनची... आ. अनिल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असलेल्या आमसभेत अचानक रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या विषयाची ठिणगी पडली आणि प्रचंड गोंधळ झाला. बाबर आणि पडळकरांच्या गटात बाचाबाची होऊन कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. शेवटी पोलीस संरक्षणात सभा पार पाडावी लागली. सुहास देशमुख यांनी आटपाडी ते शेटफळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. यावर बाबर यांनी संबंधित कामाच्या अभियंत्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी तुम्ही अधिकाऱ्यांना कशाला बोलता? ८० टक्के ठेकेदार तुमचे कार्यकर्ते आहेत. त्यांना आधी कामे चांगली करायला सांगा, असे म्हणताच बाबर गटाचे कार्यकर्ते पडळकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. प्रचंड गोंधळ, शिव्यांची लाखोली, धरा-धरा, मारा-मारा शेकडोंचा गलका झाला. पोलिसांनी कडे करून महत्प्रयासाने मोठा अनर्थ टाळला. तत्काळ फौजफाटा मागवून पोलीस संरक्षणात सभा पार पडली. यावेळी गोपीचंद पडळकर आणि आ. अनिल बाबर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पडळकर बाबर यांना म्हणाले, दादागिरीची भाषा बोलू नका. माझ्याकडे हात-बोट करून बोलू नका, आधी हात खाली करा. पळसखेलला तुम्ही बंधाऱ्याच्या कामाचा नारळ फोडला. तुमचा कार्यकर्ता ते काम करतोय, त्याने वरच सळई रोवून दगड घातलेत. तुमच्या कार्यकर्त्यांना चांगली कामे करायला सांगा. यावर बाबरही म्हणाले, तुम्ही राजकारण करू नका, माझा कार्यकर्ता असला, तरी तो गुणवत्तापूर्ण काम करत नसेल, तर त्याला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकावे. मी नारळ फोडला म्हणजे मी त्याला निकृष्ट काम करायला सांगितले असे नाही. हा वाद सुरू असतानाच बाबर आणि पडळकरांचे कार्यकर्ते शिव्या देत एकमेकांना भिडले. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ धाव घेऊन मारामारी होऊ दिली नाही. दोनवेळा सुमारे १० ते १२ मिनिटे हा गोंधळ झाला. त्यानंतर घटनास्थळावरूनच पोलिसांनी जादा कुमक मागविली. विट्याहून तत्काळ पोलिसांची कुमक आमसभेच्या ठिकाणी दाखल झाली. आ. बाबर यांच्यासह तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, रावसाहेब पाटील यांनी दोन्हीही गटांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलीस संरक्षणात सभा पुन्हा सुरू झाली. अनेकांनी पंचायत समिती, भूमिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यातील गाऱ्हाणी, भ्रष्टाचाराची कैफियत मांडली. यावेळी डी. एम. पाटील, पांडुरंग बाड, शिवाजीराव पाटील, विजय चव्हाण, भगवान सरगर, विलास कदम, सुहास देशमुख, स्नेहजित पोतदार, प्रमोद धायगुडे, उत्तम बालटे, प्रल्हाद पाटील, मोहन देशमुख, कुसुम मोटे, अनिल वाघमारे यांनी प्रश्न मांडले. आमसभेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, पंचायत समितीच्या सभापती सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी, सरपंच स्वाती सागर, बंडोपंत देशमुख, रावसाहेब पाटील, आनंदराव पाटील, रुक्मिणी यमगर, बापूसाहेब पुजारी, राजेंद्र खरात, विष्णूपंत चव्हाण, जयश्री नांगरे-पाटील, जनार्धन झिंबल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर) आमसभेची झाली ग्रामसभा! तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतील, ही अपेक्षा शनिवारच्या आमसभेने पुन्हा फोल ठरविल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भ्रष्टाचार आणि सरकारी बाबूंकडून कशी पिळवणूक होतेय, याचाच पाढा व्यक्तिगत रूपात अनेकांनी मांडला. दोनवेळा मोठा गोंधळ झाला. शेवटी-शेवटी तर माझं ऐका, माझं ऐका म्हणणाऱ्यांची संख्या वाढत गेली. अनेक निवेदने, अनेक प्रश्न लोक पोटतिडकीने मांडत होते. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या नेत्यांना कधी टाळ्या वाजवून, तर कधी हुर्रे करून समर्थन देत होते.
आटपाडीच्या आमसभेत गोंधळ
By admin | Updated: March 6, 2016 00:44 IST