सातारा : आमदार शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या जनता दरबारात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. १२२ तक्रारी यावेळी दाखल झाल्या. शिंदे यांनी दूरध्वनीवरूनच सुमारे ७० टक्के तक्रारींचा निपटारा केला. महसूल, महावितरण, जीवन प्राधिकरण, पुनर्वसन विभाग, संजय गांधी निराधार, या विभागाशी संबंधित या तक्रारींचे स्वरूप होते. महावितरण विभागाला एका शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी पैसे भरले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही त्याला महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दाद लागून देत नव्हते. या कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारलेल्या या व्यक्तीने अखेर आमदार शिंदे यांचा जनता दरबारात दाद मागण्याचे ठरविले. शुक्रवारी हा व्यक्ती सर्व पुरावे घेऊन आला होता. आमदार शिंदे यांनी या तक्रारींची संपूर्ण माहिती घेऊन संबंधित विभागाशी संपर्क साधला.संबंधित व्यक्तीला तत्काळ वीज कनेक्शन देण्याच्या सूचना त्यांनी महावितरणशी संपर्क साधून केल्या. कनेक्शन दिले गेले नाही तर कार्यालयात येऊन जाब विचारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, एसटी महामंडळाच्याबाबतीत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, अपंग मंडळी या तक्रारी घेऊन आले होते. शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत बस येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक कंडक्टर एसटी पास असलेल्यांना बसू देत नाहीत, त्यांना खाली उतरवतात. अपंग व्यक्तींनाही ओळखपत्र चालत नाही, असे सांगून पूर्ण तिकीट काढायला लावतात. ज्येष्ठ नागरिकांकडे असणाऱ्या आधारकार्डवर जन्मतारीख व त्यांचे वय दिसत असूनही सोबत जन्माचा इतर पुरावा मागितला जातो. अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. आ. शशिकांत शिंदे यांनी याबाबत एसटीचे विभाग नियंत्रकांना फोन केला; पण त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी डेपो मॅनेजरशी संपर्क साधून विभाग नियंत्रक कुठे आहेत?, असा जाब शिंदे यांनी विचारला. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा झाला नाही, तर विभाग नियंत्रकांना समक्ष भेटून आमच्या स्टाईलने जाब विचारू, असा सज्जड इशाराही त्यांनी फोनवरून दिला.राष्ट्रवादीत जनता दरबारावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सत्ता नसली तरी...राष्ट्रवादीची राज्यातील सत्ता हातून गेली असली तरी सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचेच राज्य आहे. राष्ट्रवादी भवनामध्ये शुक्रवारी आ. शिंदे यांनी घेतलेल्या जनता दरबारात झालेल्या गर्दीवरून सत्ता नसली तरी माणसांचे वैभव राष्ट्रवादीसोबत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
८४ तक्रारींचा निपटारा फोनवरच
By admin | Updated: October 9, 2015 21:53 IST