सातारा : सातारच्या जिव्हाळ्याच्या कास धरण उंची वाढविण्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार नगरविकास विभागाकडून सातारा नगर परिषदेला एकूण ५७ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने जलमंदिर पॅलेस येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
उदयनराजे भोसले यांनी नुकतीच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कास धरणासह इतर अनेक विकासकामांबाबत निर्णय घेण्याबाबत विनंती प्रस्ताव दिलेले होते. त्यानुसार सातारकरांच्या वापराच्या पाण्याची गरज आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याचा निर्णय खासदार उदयनराजेंनी घेतला आणि अनेक अडथळ्यांवर नियमानुसार मार्ग काढत कासच्या कामास गेल्या वर्ष-दीड वर्षापासून सुरुवात करण्यात आली.
या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मंजुरीसुद्धा डिसेंबर २०२० मध्ये मिळविण्यात आली, तसेच पूर्ण झालेल्या कामांची आवश्यक असणारी उपयोगिता प्रमाणपत्रे वेळच्या वेळी सादर करण्यात आली होती. याबाबतच खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वीच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन कास धरण उंची वाढविण्याच्या सुधारित मंजुरीनुसार नगरविकास विभागाने निधी वितरित करावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार ३० मार्चच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत रक्कम रुपये ५७ कोटी ९१ लाखांपैकी २५ कोटी रुपये सातारा नगर परिषदेस कास घरण उंची वाढविण्याच्या कामाकरिता प्राप्त झाले आहेत.
खासदार उदयनराजेंनी कण्हेर धरण उद्भवामधून सातारच्या आताच्या वाढीव भागासह एकूण १७ उपनगरे, गावे यांना पाणीपुरवठा करणारी योजना मांडली आहे. कास धरणाची उंची वाढवून साठवण क्षमता वाढवून पाणीपुरवठा करता येणारी कास धरण उंची वाढविण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम खासदार उदयनराजे यांनीच मांडला. आता कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू होऊन, सुमारे ७० ते ८० टक्के पूर्ण होत आले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करण्यात आल्यावर वाढीव हद्दीसह सातारकरांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल आणि ती सातारकरांसाठी एक वेगळी जिव्हाळ्याची उदयनराजेंनी दिलेली भेट असेल, असेही खासदार उदयनराजे भोसले यांचे जलमंदिर पॅलेसमधून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शेवटी नमूद केले आहे.