सातारा : ‘जिहे-कटापूर योजनेच्या अंतर्गत बॅरेजच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी मंजूर केला आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिहे-कटापूर योजनेला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करीत आलो आहे. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर सत्कारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून २० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. जिहे-कटापूर योजनेच्या कृष्णा नदीवरच्या बॅरेजचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर पावसाच्या पुरामध्ये झालेले बांधकामही वाहून जाण्याची भीती त्यांच्यासमोर ठेवली. पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही यामध्ये खूप सहकार्य केले.’‘आणखी याच्या पुढचा लढा आहे तो म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता इतर प्रकल्पांना मिळविणे. त्यामध्ये उरमोडी आणि टेंभू आहे. जिहे-कटापूर योजना झाली म्हणजे माणचे आणि खटावचे दुखणे संपले असे नव्हे.उरमोडीमध्ये आज तीनच पंप कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी खटाव, माणमध्ये जात नाही. त्या ठिकाणी किमान आठ ते नऊ पंप बसले तर हे पाणी खटाव आणि माणमध्येही जाऊ शकते. त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. ती मिळविण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी निकराचे प्रयत्न करणार आहे. तसेच प्रयत्न टेंभूच्या बाबतीतही चालू आहेत. टेंभूचे पाणी हे खटाव, माणच्या पूर्व भागाला मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जिहे-कटापूरच्या बाबतीतला हा पहिला विजय आहे. कारण सुधारित प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा हा निधी मिळाला आहे. आता पुढचा टप्पा आहे तो नेर आणि आंधळीमध्ये पाणी सोडायचा. नेरमधील पाणी हे एका वर्षात येऊ शकते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आमचे शिष्टमंडळ लवकरात लवकर राज्यपालांना भेटून हा निधी उपलब्ध कसा होईल आणि अनुशेषामध्ये अडकलेली ही जिहे-कटापूर योजना कशी बाजूला काढता येईल, असा प्रयत्न सुरू आहे. - दिलीप येळगावकर, माजी आमदारटेंभूू योजना लघुसिंचनाखाली घ्यावीज्यावेळी टेंभू योजना मंजूर झाली, त्यावेळी खटाव, माणचा पूर्व भाग हा गृहीत धरला नव्हता. आता गृहीत धरायला लावायचा आहे. त्यामुळे व्याप्तीमधला बदल आहे. तो राज्यपालांनी स्वीकारला पाहिजे.त्यासाठी मंत्रिमंडळाने जशी जिहे-कटापूरची शिफारस केली, तशी टेंभूचीही केली पाहिजे. टेंभू ही योजना पूर्णपणे लघुसिंचनाखाली घ्यावी, अशीही आमची मागणी असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.
जिहे-कटापूर योजनेला २० कोटी निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2015 00:18 IST