लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत खटाव तालुक्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीकरण मोहीम सुरू असून आजपर्यंत तालुक्यातील १२ हजार ७७५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
साठ वर्षांवरील सर्व नागरिक तसेच ४५ ते ६० वर्षांच्या दरम्यान गंभीर आजार असलेल्यांनी ॲपमधून रजिस्ट्रेशन करून घ्यावे. तसेच ग्रामपचांयत स्तरावर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यामधून नाममात्र फी घेऊन रजिस्ट्रेशन करून दिले जात आहे. तरी याचा नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांनी केले आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून खटाव तालुक्यात गत तीन महिन्यांपूर्वीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक शिक्षक व फ्रंटलाईन वर्कर असलेल्या २,२२९ कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.तर ९८३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये पहिला डोस १,३८३ आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आला . तर ९८५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला. लसीकरणामध्ये ६० वर्षांवरील ५,७०८ नागरिकांना तसेच ४५ ते ६० वर्षादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या १,४८७ नागरिकांना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत खटाव तालुक्यातील ३,६१२ जणांनी पहिला डोसतर १,९६८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ७,१९५ जणांनी आज अखेर पहिला डोस घेतला असून असे एकूण मिळून १२,७७५ नागरिकांनी लसीकरण घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
खटाव तालुक्यातील वडूज, औंध व कलेढोण अशा तीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणि डिस्कळ, पुसेगाव, खटाव, कातर खटाव, मायणी, निमसोड व पुसे सावळी अशा सात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोवीशिल्ड लसीकरण मोहीम सुरू असून प्रत्येक ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी व चार आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी ज्या प्रकारच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तोच दुसरा लसीचा डोस घेणे क्रमप्राप्त असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांनी दिली.
फोटो: खटाव तालुक्यातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेताना, सोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख.( शेखर जाधव )