सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दुसऱ्यांदा सुरू झाला आहे. पण, अजूनही जिल्ह्यातील काही गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील १०१ गावांनी अजूनही कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ३९१ गावांत कोरोना विषाणू पोहोचलाय. यामध्ये सर्वाधिक बाधित गावे ही सातारा, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यातच आहेत.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आला तो परदेशातून आलेला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. एप्रिल आणि मे महिन्यात स्थिती कमी होती. तसेच काही गावांत कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यातच लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यातील गावांच्या सीमा बंद होत्या. अनोळखी व्यक्तींना प्रवेश नव्हताच. त्याचबरोबर चाकरमान्यांनाही गावात येताना शाळांमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले. एवढ्या मोठ्या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागले. मात्र, जूननंतर काही प्रमाणात ढिलाई आली आणि कोरोना कहर सुरू झाला. तो सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार २६४ गावांत कोरोना रुग्ण सापडले होते; तर २२८ गावे कोरोनापासून दूर होती. असे असले तरी. कोरोना आता जिल्ह्यातील सर्वच गावांत पोहोचणार की काय, असे वाटू लागले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून बाधितांचे प्रमाण एकदमच वाढले आहे. मार्च महिन्यात तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कारण, एकाच महिन्यात साडेसहा हजारांवर बाधित आढळले; तर ५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. एप्रिल सुरू झाल्यापासून तर दिवसाला ५००, ७०० च्या पटीत बाधित स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत दोन हजारांवर बाधित समोर आले. त्याचबरोबर अनेक गावांतही कोरोनाचा शिरकाव झाला.
जिल्ह्यात १४९२ ग्रामपंचायती आहेत. यामधील १ हजार ३९१ गावांत आतापर्यंत कोरोना पोहोचला आहे, तर १०१ गावांनी अजूनही कोरोनाला गावाबाहेरच ठेवले आहे. कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता, येत्या काही दिवसांत नवीन काही गावांत कोरोना पोहोचू शकतो. पण, ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन, गावासाठी काही नियम लागू केले, तर अजूनही त्या-त्या गावापासून कोरोना दूर राहू शकतो. कोरोना कहर सुरू असताना अशा उपाययोजना आवश्यकच ठरल्या आहेत. तरच गावापासून कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. तर विशेष म्हणजे अनेक गावे ही दूर, दुर्गम भागात आहेत. त्याचबरोबर तेथील लोकसंख्याही कमी आहे. अशी अनेक गावे कोरोनापासून दूर आहेत.
चौकट :
कोरोना रुग्ण आढळणारी तालुकानिहाय गावे...
खंडाळा तालुका ६९, पाटण १९४, फलटण ११८, जावळी ११८, सातारा १९७, कऱ्हाड १८३, कोरेगाव १२८, खटाव १२६, माण ९६, वाई ११० आणि महाबळेश्वर तालुका ५२.
कोट देणार आहे...
...............................