सांगली : केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी व अनामत रक्कम परत देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लिपिकाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अरुण योगिनाथ कुशिरे (वय ५७, रा. उरूणवाडी, इस्लामपूर) असे लिपिकाचे नाव असून, गुरुवारी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात सापळा लावून कुशिरे यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते.
तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून, त्यांचे कामाचे बिल व अनामत रक्कम प्रलंबित होती. हे बिल अदा करण्यासाठी कुशिरे याने ३५ हजारांची मागणी केली होती. त्यानंतर २५ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर कुशिरे याच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुशिरे याच्या घराची झडती घेत तपासणी केली.