सांगली : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातर्फे पदाधिकारी, अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाकडील फर्निचरचे काम सुरु आहे. स्वीय निधीतून चाळीस लाखांची तरतूद केली असून ठेकेदाराच्या नावावर काही अधिकारीच हे काम करीत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्थांच्या नावावर ठेके घेऊन लाखो रूपये उकळत आहेत. अधिकारीच ठेके घेत असल्यामुळे तेथील कामाचा दर्जा पाहिला जात नाही. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून चांगल्या दर्जाच्या साहित्याची बोगस बिले दाखवून पैसे काढले जात असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात असे प्रकार सुरु असल्याचे एका ठेकेदारानेच सांगितले.सध्या जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयात फर्निचर व रंगरंगोटीचे सुमारे चाळीस लाखांचे काम सुरु आहे. या तिन्ही कामांचा ठेका एका मजूर संस्थेला मिळाला आहे. तीन लाखावर कामाची रक्कम असल्यामुळे नियमानुसार आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारास हे काम मिळाल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये रंगली आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे काम करीत असताना आर्किटेक्ट नेमण्याची गरज होती. परंतु, तसे काहीच केले नसल्याचे बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्यावरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदार करीत असलेल्या कामावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण का नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.आॅनलाईन ठेकेही मॅनेज? अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्यामुळे कोणते काम कोणाला मिळाले पाहिजे, याची व्यवस्था ते करतात. जिल्हा परिषदेतील पैसे मिळविण्याचा ठेका ठराविक मजूर संस्था अथवा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास मिळावा, यासाठी ठरवूनच निविदा भरल्या जात आहेत. यामध्ये अन्य कोणी निविदा भरू नये, अशी सूचना काही शाखा अभियंतेच ठेकेदारांना करत आहेत. अधिकाऱ्यांच्या या कारभारावर जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकारी मालामाल
By admin | Updated: September 4, 2015 22:37 IST