जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा वर्षाचा कालावधी संपला आहे. तरीही पदाधिकारी बदल झाला नसल्यामुळे इच्छुक सदस्य नाराज आहेत. वर्षानंतर पदाधिकारी बदलाचे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले होते, त्यामुळे बदल करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत खासदार संजयकाका पाटील व आमदार सुरेश खाडे आग्रही होते. गत आठवड्यात खा. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला काही नेते अनुपस्थित होते. मात्र उपस्थित असणाऱ्यांनी बदलाला होकार दिला होता.
बदलाची जबाबदारी खा. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. आ. खाडे, आ. सुधीर गाडगीळ व सत्यजित देशमुख यांनी पदाधिकारी बदलाला हिरवा कंदील दर्शविला आहे. भाजपचे २६ सदस्य आहेत. त्यांच्यासोबत रयत क्रांती आघाडी चार, शिवसेना तीन आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन असे मिळून ३५ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेमध्ये भाजप सत्तेत असली तरी, शिवसेना महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्यामुळे सत्तेतून बाहेर जाणार, की सोबत राहणार, हे पाहावे लागणार आहे. खासदार पाटील यांना आघाडीतील नेत्यांशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत.
रविवारच्या बैठकीत पदाधिकारी बदलावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता होती. मात्र बैठकच बारगळल्याने इच्छुकांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.