आटपाडी : आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील तळेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आणि खाजगी ठेकेदाराने दोन पाईप टाकत तक्रारींवर पडदा टाकण्याचे काम केले आहे. वास्तविक अंतिम बिल अदा केले. त्यामध्ये स्पष्ट १० नग सिमेंट पाईपचा उल्लेख करूनच बिले काढली आहेत.
य. पा. वाडीतील तळेवस्ती येथील जन सुविधा योजने अंतर्गत खडीकरण रस्ता केला आहे. यासाठी चार लाख रुपये खर्च आला आहे. सुमारे अडीचशे मीटर खडीकरण व एका पुलावर पाईप टाकण्याचे काम होते.
जन सुविधा योजनेचे काम करगणितील श्रीराम मजूर संस्थेस मिळाले होते. मात्र या मजूर संस्थेऐवजी या रस्त्याचे काम एका खाजगी व्यक्तीने करत रस्ते कामात गोलमाल केला आहे.
मुळात तळेवस्तीकडे जाणारा रस्ता नकाशाप्रमाने केला आहे का? मूळ रस्ता सोडून रस्ता कसा केला? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्ता करत असताना खडीकरण व पुलासाठी दहा सिमेंट पाईपचे पैसे संबंधित संस्थेला आदा केले आहेत. मात्र संस्थेने स्वतः काम न करता एका खाजगी व्यक्तीला काम दिले होते.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबधीत खाजगी व्यक्तीने तळेवस्ती रस्त्यावरील पुलावर अजून दोन सिमेंट पाईप टाकल्या आणि केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण टाकण्याचे काम केले आहे. याबाबत चाैकशी करुन कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.