लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय, उद्योगधंद्यासाठी केंद्रीय योजनांचा अभ्यास करावा. केंद्रीय योजनांचा लाभ खेडेगावापासून ते शहरी भागातील युवकांना होण्यासाठी भाजप युवक संघटना कार्यरत आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी केले.
युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत महाडिक यांनी समाजमाध्यमाद्वारे युवकांशी थेट संवाद साधला. महाडिक म्हणाले, युवकांमध्ये कौशल्य विकसित करून त्याचा उपयोग कुशल मनुष्यबळासाठी करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरू आहे. भविष्यातील बाजारपेठेसाठी कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाच्या मदतीने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. नवीन धोरणांतर्गत अभियान म्हणून लागू केलेली ही नवीन योजना मनुष्यबळ आणि उद्योग विकासामध्ये एका नवीन युगाची सुरुवात करेल.
ते म्हणाले, गरीब परिस्थितीमुळे शाळा सोडलेले व दहावीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत प्रशिक्षण व त्यानंतर नोकरी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २०२२ पर्यंत दहा कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट पेठ या संस्थेमध्ये मोबाइल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन आणि वेल्डर हे कोर्सेस राबविण्यात आले आहेत.
यावेळी युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन सम्राट महाडिक यांनी केले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक युवकांनी आपापल्या भागातील अडीअडचणी महाडिक यांच्याकडे मांडल्या.