इस्लामपूर : इस्लामपूर-कामेरी रस्त्यावरील दत्त टेकडी परिसरात उसाच्या ट्रॅक्टरला ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात मालेवाडी (ता. वाळवा) येथील तरुण जागीच ठार झाला. प्रथमेश रायबा शेवाळे (वय १६) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. याबाबत मृताचे वडील रायबा तानाजी शेवाळे (वय ४५, मालेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रायबा शेवाळे हे आपला मुलगा प्रथमेश याच्यासोबत दुचाकीवरून (क्र. एमएच १० सीवाय ०२६४) इस्लामपूर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. तेथे जेवण करून रात्री नऊच्या सुमारास मालेवाडी गावी जाण्याकरिता कामेरीमार्गे निघाले होते. दत्त टेकडी परिसरात अज्ञात व्यक्ती त्याच्या दुचाकी (क्र. एमएच ११ ई ५७३५) वरून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओलांडून भरधाव वेगाने शेवाळे यांच्या दुचाकीवर येऊन आदळला. या धडकेमुळे पाठीमागे बसलेला प्रथमेश हा रस्त्यावर जोरात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो रक्तबंबाळ झाला होता. यावेळी दुचाकीचालकाने तेथून पलायन केले. शेवाळे यांनी नागरिकांच्या मदतीने मुलगा प्रथमेशला उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
फोटो - १०१२२०२०-आयएसएलएम-प्रथमेश शेवाळे