सांगली : सांगलीवाडी येथील विजय चौक परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन युवकाने आढ्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेश बाळासाहेब सातपुते (वय १६) असे मृताचे नाव असून, तो अकरावीत शिकत होता. सोमवारी दुपारी अडीचच्यासुमारास ही घटना घडली.
मृत राजेश सांगलीवाडीत राहण्यास होता. तो शहरातील आरवाडे हायस्कूलमध्ये अकरावीत होता. सोमवारी दुपारी तो महाविद्यालयामधून आला व जेवण केले. त्यानंतर त्याने साडीच्या साहाय्याने आढयाला गळफास घेतला. थोड्यावेळाने कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची शहर पोलिसात नोंद आहे.