सांगली : येथील वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादकांची ४४ कोटींची थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम सुरू होणार की नाही, याबद्दल सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करणार असून, १५ हजार हेक्टर उसाची नोंदणी केल्याचे स्पष्ट केले. ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्यांशी करार झाले असून कारखान्याची किरकोळ दुरुस्तीची कामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून कधीकाळी नावलौकिक मिळविलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत हंगामात गाळप केलेल्या उसाची ४५ कोटीची देणी अद्यापही दिलेली नाहीत. उसाची बिले भागविण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरज तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. त्यातच साखर गोदामालाही सील ठोकण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या देण्यांसोबतच जिल्हा बँकेचे ७८ कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या पगाराची थकबाकी मोठ्याप्रमाणात असल्यामुळे कारखान्याचा यंदाचा हंगाम सुरू होणार की नाही, याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कारखान्याचा हंगाम सुरू करण्याच्यादृष्टीने सर्व प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी आणि कामगारांची थकित पूर्ण रक्कम जागा विक्रीतून देणार आहे. यावर्षीचा हंगाम सुरु करण्यासाठी १५ हजार हेक्टर उसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही ऊस नोंदणीचे आवाहन केले आहे. ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांशी करारही केला आहे. (प्रतिनिधी)
यंदाचाही हंगाम होणार
By admin | Updated: September 3, 2014 00:03 IST