विटा : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विटा नगरपालिका कर्मचारी आक्रमक झाले. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह पालिकेचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करीत एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले.
ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास माजीवाडा प्रभाग येथे अतिक्रमणविरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत हाेत्या. तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अरजित यादव याने पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचे दैनंदिन काम बंद करून जाहीर निषेध केला. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी हा प्रकार अत्यंत निषेधार्थ असून शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे तसेच हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, संघटनेचे विभागीय अध्यक्ष अनिल पवार, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, प्रकाश गायकवाड, बाजीराव जाधव, सुजित पाटील, राजेंद्र चिरमे, राजेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : ३१ विटा १
ओळ : विटा येथे ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना निवेदन देऊन काम बंद आंदोलन केले.