कोकरुड : पाचवड फाटा ते कोकरुड राज्य मार्ग डांबरीकरणाचे काम रात्री सुरू असल्याने त्याच्या दर्जाबाबत नागरिकांतून शंका उपस्थित केली जात आहे. हा रस्ता सातारा जिल्हा बांधकाम विभागाकडे असल्याने सांगली बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
पाचवड फाटा (ता. कराड) ते कोकरुडदरम्यानच्या रस्त्याचे काम सध्या शिराळा तालुक्याच्या हद्दीत सुरू आहे. काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या ठेकेदाराकडून रात्री उशिरा अंधारात काम सुरू असल्याने त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी चढ काढून रस्ता सपाट करून त्याठिकाणी फक्त खडी टाकली आहे. डांबरीकरण केलेल्या ठिकाणी साईडपट्टी भरली नसल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत असून, दररोज लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढत आहेत.
शेडगेवाडी ते कोकरूड रस्त्यावरील खुजगाव जलसेतूजवळील रस्त्याचे काम कमी अंतराने झाल्याचे लोकांनी आंदोलन करून ते उजेडात आणल्याने, सध्या येथे बांधलेल्या गटारीच्या बाहेरून रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे सर्व कामकाज सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने ते येतात कधी आणि जातात कधी हेच समजत नसून, सांगली जिल्हा बांधकाम विभाग यात हस्तक्षेप करत नसल्याने या रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.