कसबे डिग्रज : यंदा बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात लोकरी मावा पडला आहे. अजूनही गळीत हंगामास तीन ते चार महिने अवकाश आहे. तोपर्यंत लोकरी माव्याचा विपरित परिणाम होत असून उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मिरज पश्चिम भागातील कृष्णाकाठच्या कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, पद्माले, त्याचप्रमाणे वारणा काठच्या समडोली, कवठेपिरान, दुधगाव आदी गावात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षीच्या गळीत हंगामासाठी या परिसरात सुमारे दहा हजार एकर ऊस उपलब्ध होणार आहे. पाणी, खते, मशागतीची कामे व्यवस्थित झाल्याने यावर्षी ऊस पिके चांगली आहेत; पण गेल्या काही दिवसांपासून उसाच्या पिकांवर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे
पांढरी शुभ्र लोकरी सारखी कीड पाणाखाली दिसते. पानातील हरितद्रव्य शोषून घेतात आणि पाने काळी पडून वाळतात त्यामुळेच उसाची वाढ खुंटते. त्याचा मोठा परिणाम उत्पनावर होतो. ऊन पावसाच्या बदलत्या हवामानामुळे ही लोकरी मावा कीड मोठ्या प्रमाणात पसरते.