येळावी : येळावी (ता. तासगाव) येथे शांतिनगर वस्तीवर तिघा सशस्त्र चोरट्यांनी महिलेस मारहाण करून घरातील ४५ हजारांची रक्कम लुटली. हा प्रकार शनिवारी दुपारी एक वाजता घडला. येळावीत सोमेश्वर चव्हाण कुटुंबासह शांतिनगर वस्तीवर राहतात. मालवाहू वाहने भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. भाड्यातून मिळालेले ४५ हजार रुपये त्यांनी घरी ठेवले होते. शनिवारी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. घरी मनीषा सोमेश्वर चव्हाण व त्यांच्या सासू दोघीच होत्या. काही वेळाने मनीषा यांच्या सासूही घराबाहेर गेल्या. ही संधी साधून आधीच बाथरूममध्ये दबा धरून बसलेल्या तिघा दरोडेखोरांनी मनीषा यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. घरातील सर्व दरवाजे आतून बंद केले. त्यानंतर कपाट विस्कटून त्यातील ४५ हजाराची रोकड काढून घेतली. इतर शोधाशोध करीत असताना मनीषा यांच्या सासूने दरवाजा उघडण्यासाठी बाहेरून हाक दिली. दार उघडत नसल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. दरम्यान, ग्रामस्थ जमा होऊ लागल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पश्चिमेकडील उसातून पोबारा केला. चोरट्यांनी काळी पॅन्ट, शर्ट, मास्क, हातमोजे परिधान केले होते. त्यांच्याकडे कटावणी, चाकू व इतर धारधार शस्त्रे असल्याचे चव्हाण कुटुंबियांनी सांगितले. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
येळावीत चोरट्यांची महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2015 00:14 IST