फोटो : ११०३२०२१एसएएन०१ : करंजे (ता. खानापूर) येथे याच मळणी यंत्रात अडकून सुभद्रा मदने यांचा मृत्यू झाला.
खानापूर : करंजे (ता. खानापूर) येथील मदने मळ्यात मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचे शीर धडावेगळे होऊन शरीराचे तुकडे झाले. सौ. सुभद्रा विलास मदने (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
सुभद्रा मदने दुसऱ्याच्या शेतातील कामावरून माघारी येऊन स्वत:च्या शेतातील मळणीसाठी गेल्या होत्या. मदने मळा परिसरातील त्यांच्या शेतातील गहू मळणीचे पूर्ण होत आले होते. सुभद्रा मदने यांनी मळणी यंत्राच्या बाजूला पडलेल्या गव्हाच्या कुड्या वेचण्यास सुरुवात केली. कुड्या वेचत असताना त्यांचा पदर मळणी यंत्रामध्ये अडकला आणि त्या क्षणार्धात यंत्रामध्ये ओढल्या गेल्या.
मळणी यंत्र बंद करण्यापूर्वीच यंत्रामध्ये अडकून सुभद्रा यांचे शीर धडावेगळे झाले. कुटुंबियांसमोर त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक आणि हृदय पिळवटून टाकणारे होते. सुभद्रा मदने यांचे शीर तुटून तीन फुटावर पडले होते. संपूर्ण शरीर छिन्नविछिन्न झाले होते. ही घटना पाहून प्रत्येकजण विचलित झाला होता.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. झालटे, तुकाराम नागराळे पुढील तपास करीत आहेत.