सांगली : भाजून जखमी होऊन गेल्या तीन दिवसांपासून उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या ‘त्या’ महिलेस अखेर वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) उपचारासाठी दाखल करून घेतले आहे. ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत महिलेस तातडीने उपचारार्थ दाखल करण्याचे आदेश दिले.नंदा लोंढे (वय ४२, रा. गोटखिंडी, ता. वाळवा) असे या महिलेचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून ती रुग्णालयातील औषध विभागाच्या बाकड्यावर बसून होती. ती भाजली आहे. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार होत नसल्याचे सांगितले. तिच्या आईने तिला दाखल करुन घेण्याची विनंती केली, पण कोणीच दखल घेतली नाही. शेवटी आईने तिला सोडून घर गाठले. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. भाजलेली ही महिला बाकड्यावरच बसून आहे. तिला जेवण नाही की पाणी मिळाले नाही. तिला चालताही येत नव्हते. ती कुठल्या गावची, याची नोंदही घेण्यात आली नव्हती. अशा रुग्णांची दखल घेण्यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. पण त्यांचेही या महिलेकडे लक्ष गेलेले नाही. अखेर ‘लोकमत’ने शनिवारी ही महिला उपचाराच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)
‘ती’ महिला अखेर ‘सिव्हिल’मध्ये दाखल
By admin | Updated: August 7, 2016 01:04 IST