लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सांगली शहरातील ट्रक टर्मिनलचा प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवू, असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ट्रान्सपोर्ट असोसिएशनला दिले.
शिवसेनेच्या गणेश मार्केट येथील कार्यालयात बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसैनिक व महेश पाटील यांच्याबरोबर सांगलीतील प्रलंबित ट्रक टर्मिनलविषयी चर्चा करण्यात आली.
महेश पाटील म्हणाले की, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटना चांगले काम करीत आहे. २०१० पासून सांगलीतील प्रलंबित ट्रक टर्मिनलचा प्रश्न सोडवावा व पद्मा टॉकीज मागील सुमारे १७ एकर जागेत ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिका व शासनाकडे निवेदने दिलेली आहेत. ट्रान्सपोर्ट असोसिएशनला भाडेतत्त्वावर ही १७ एकर जागा महापालिकेने हस्तांतरित करावी, अशी मागणी केली होती. प्रस्ताव देताना सुमारे ४० ते ५० कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनल विकसित करण्याची तयारी दर्शविली होती. तत्कालीन आयुक्त, महापालिकेतील सत्ताधारी व महाराष्ट्र सरकारकडे प्रस्तावही दिला होता, परंतु तो लालफितीत अडकून पडला.
लोकप्रतिनिधी, सर्व पक्ष, संघटनांनी याविषयी पाठपुरावा करायला हवा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसैनिकांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे व हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी रावसाहेब घेवारे, पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, लक्ष्मण वडर, प्रकाश लवटे आदी उपस्थित होते.