सांगली : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार तीत्काळ देऊ, तसेच पदोन्नतीचा प्रश्नही आठ दिवसांत मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. चालकांची नियुक्ती ठेकेदाराकडून असल्यामुळे संबंधितांना नोटीस बजावून तत्काळ पगार देण्याची सूचना दिली आहे. यामुळे आरोग्य संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. १० जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी चर्चेसाठी बोलविले होते. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत, आरोग्य सेवक, सेविका पर्यवेक्षक यांची पदोन्नतीची फाईल तीन महिने प्रलंबित आहे, प्रशासनाच्या चुकीमुळे काही कर्मचारी पदोन्नतीशिवायच सेवानिवृत्त झाले आहेत, कंत्राटी आरोग्य सेविका व वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून पगार झाले नाहीत, यासह अनेक प्रश्न संघटनेने प्रशासनासमोर मांडले. यावेळी गावडे यांनी कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलवून घेतले. या मागण्या प्रलंबित राहण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला. कर्मचाऱ्यांचे पगार तत्काळ देऊ, तसेच पदोन्नतीचा प्रश्नही आठ दिवसांत मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी विभागीय अध्यक्ष एस. एल. कुंभार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते डी. जी. मुलाणी, सुरेश कांबळे, पी. एन. काळे, शिवाजी खाडे, कार्याध्यक्ष शांताराम कुंभार, आर. एस. मदवान, विनायक पाटील उपस्थित होते.