कसबे डिग्रज : कवठेपिरान (ता. मिरज) हिंदकेसरी मारुती माने यांनी कित्येक वर्षे सरपंच आणि त्यांच्यानंतर पुतणे भीमराव माने यांनी निर्विवाद बिनविरोध सत्ता गाजविली. गतवेळी अपयश आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी यावेळी दमदार पॅनल उभारून ‘मोठ्या’ नेत्यांच्या पाठबळावर सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे. प्रचार चुरशीने चालू आहे.
गेली ५० वर्षे कवठेपिरानमध्ये ग्रामपंचायतीसह सर्वच निवडणुका हिंदकेसरी मारुती माने यानी बिनविरोध केल्या होत्या. नि:स्वार्थी भावनेतून गावचा विकास हेच त्यांचे राजकारण राहिले. तोच कित्ता भीमराव माने यांनी गिरविला. पण पाच वर्षांपूर्वी प्रथमच गावात निवडणूक लागली. सर्व नीतीचा वापर केला आणि 'विरोध' आहे हे दाखवून दिले. सत्ता मिळाली नाही पण गावात ताकद दाखविली.
सध्याच्या निवडणूक भीमराव माने यांचे हिंदकेसरी पॅनेल आणि संग्राम जखलेकर, सचिन पाटील आणि वडगावे गट यांनी कवठेपिरान ग्रामविकास पॅनेल उभे केले आहे. गतवेळी मिळालेला प्रतिसाद; यंदा केलेली तयारी या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेला सुरुंग लावण्याची जय्यत तयारी केली आहे.
कवठेपिरनमध्ये सहा वाॅर्ड असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रवादीचे नेते वाॅर्ड क्रमांक २ आणि ४ मध्ये आहेत. त्यामुळे त्या वाॅर्डात ताकत दाखवली जाईल, अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे ५ आणि ६ या दोन वाॅर्डवर दोन्ही पॅनेलनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
चौकट
मतदारांकडे लक्ष
गत विधानसभा निवडणुकीत भीमराव माने यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. विधानसभेवेळी कवठेपिरानमध्ये जयंत पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मतदान मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राबले होते. त्याच मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे मतदार काय करतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल.